T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024) सुपर 8 च्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशचा पराभव केला. पावसाचा अडथळा आलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं डकवर्थ लुईस नियमानुसार 8 रननं पराभूत केलं. या विजयासह अफगाणिस्ताननं या वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय. आयसीसी स्पर्धेची सेमी फायनल गाठण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तानच्या या कामगिरीची संपूर्ण जगभर चर्चा आहे. त्याचवेळी या मॅचच्या दरम्यान घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या मॅचच्या दरम्यान अफगाणिस्तानचा कोच जोनाथन ट्रॉटनं इशारा करताच गुलबदीन नईबनं (Gulbadin Naib) नं असं काही केलं की राशिद खानलाही क्षणभर धक्का बसला. अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाबरोबरच नईबच्या या कृतीचीही सध्या चर्चा सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
बांगलादेशची इनिंग सुरु असताना हा प्रकार घडला. त्यावेळी बांगलादेशचा स्कोअर 7 आऊट 81 असा होता. रिमझिम पाऊस सुरु झाल्यानंतर अफगाणिस्तानचा कोच जोनाथन ट्रॉटनं (Jonathan Trott) डगआऊटमधून मैदानातील खेळाडूंना इशारा केला. कोचनं इशारा करताच स्लिपमध्ये फिल्डिंग करत असलेली गुलबदीन धाडकन मैदानात पडला. त्यानं स्नायू दुखावल्याची तक्रार केली.
गुलबदीननं ही तक्रार केल्यानं मॅच थांबवण्यात आली. त्यानंतर अफगाणिस्तानची मेडिकल टीम मैदानात दाखल झाली आणि त्यांनी त्याला बाहेर नेलं. गुलबदीन ज्या पद्धतीनं मैदानात पडला ते पाहून त्यानं कोचच्या इशाराऱ्यानंच ही कृती केली असं वाटत होतं.
ट्रेंडींग बातमी - अफगाणिस्तान जिंकताच संपूर्ण देश रस्त्यावर... असं सेलिब्रेशन तुम्ही कधी पाहिलं नसेल, Video
थोड्यावेळानं मॅच सुरु झाली. त्यावेळी बांगलादेशला त्यांचा पराभव टाळता आला नाही. अत्यंत चुरशीनं झालेल्या या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं 8 रननं विजय मिळवलाय. पावसाच्या अडथळ्यानंतर बांगलादेशला विजयासाठी 19 ओव्हर्समध्ये 114 रन्सचं लक्ष्य होतं. पण, त्यांची पूर्ण टीम 17.5 ओव्हर्समध्ये 105 रन्सवरच ऑल आऊट झाली. अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.