जाहिरात

संजू, इशान अन् बुमराह... ही नावं आता विसरता येणार नाहीत! भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'हे' आहेत खरे हिरो

IND vs NZ T20 World Cup Final 2026: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय वाघांनी ज्या पद्धतीने मैदान गाजवलं, ते पाहून जग थक्क झालं आहे.

संजू, इशान अन् बुमराह... ही नावं आता विसरता येणार नाहीत! भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'हे' आहेत खरे हिरो
T20 World Cup 2026 : प्रत्येक सामन्यात भारताचा एक नवा हिरो जन्माला आला आणि त्याने विजयाची स्क्रिप्ट लिहिली
मुंबई:

IND vs NZ T20 World Cup Final 2026:  भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ज्या क्षणाची करोडो भारतीय डोळे लावून वाट पाहत होते, तो क्षण अखेर सत्यात उतरला. ICC T20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी धुव्वा उडवत रेकॉर्डब्रेक तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. 

या संपूर्ण स्पर्धेत भारतीय वाघांनी ज्या पद्धतीने मैदान गाजवलं, ते पाहून जग थक्क झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक मॅच सोडली, तर प्रत्येक सामन्यात भारताचा एक नवा हिरो जन्माला आला आणि त्याने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. या ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत, ते आपण जाणून घेऊया.

संजू सॅमसनचा मास्टरक्लास

या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो म्हणजे विकेटकीपर बॅटर संजू सॅमसन. सुरुवातीला संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये फारशी संधी मिळाली नव्हती, पण सुपर 8 मध्ये पुनरागमन करताच त्याने भारतीय टीमचं नशीबच बदलून टाकलं. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने फक्त 42 बॉलमध्ये 89 रनची वादळी खेळी करून भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत नेलं. संजूचा हा फॉर्म फायनलमध्येही कायम होता. 

न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यात त्याने 46 बॉलमध्ये 89 रनची जबरदस्त खेळी केली. वर्ल्ड कप फायनलमध्ये कोणत्याही भारतीय बॅटरने केलेला हा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. संजूने सलग 3 फिफ्टी लगावत भारताचा विजय निश्चित केला. तो या स्पर्धेत 5 मॅचमध्ये 321 रन करून तिसरा सर्वाधिक रन करणारा बॅटर ठरला.

( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )

जसप्रीत बुमराहचा भेदक स्पेल

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो जगातील सर्वात खतरनाक बॉलर का आहे. सेमीफायनलमध्ये जिथे रनची पाऊस पडत होता, तिथे बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 33 रन देऊन 1 विकेट घेतली आणि प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवलं. फायनलमध्ये जेव्हा कीवी बॅटर वेगाने रन करत होते, तेव्हा त्याने रचिन रवींद्रची महत्त्वाची विकेट काढून मॅच भारताच्या बाजूने झुकवली.

फायनलमध्ये बुमराहने 4 ओव्हरमध्ये 15 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या. बुमराहने या स्पर्धेत एकूण 14 विकेट्स घेतल्या आणि तो वरुण चक्रवर्तीसह टॉपवर राहिला.

( नक्की वाचा : IND vs NZ : शून्यावर आऊट होऊनही सूर्याने असा पलटवला सामना; भारताने न्यूझीलंडला कसं हरवलं? वाचा सविस्तर! )

इशान किशनची तुफानी बॅटिंग

ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इशान किशन भारतासाठी हुकमी एक्का ठरला. त्याचं पुनरागमन एखाद्या स्वप्नासारखं होतं. सेमीफायनलमध्ये त्याने संजूच्या साथीने 18 बॉलमध्ये 39 रनची वेगवान खेळी केली. फायनलमध्ये त्याने आपली जबाबदारी ओळखून तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करताना अवघ्या 25 बॉलमध्ये 54 रन केले. त्याच्या या फटकेबाजीमुळेच भारतीय टीम 255 रनचा रेकॉर्ड स्कोअर उभा करू शकली. 

त्याने फिल्डिंगमध्येही  2 अफलातून कॅच पकडून न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशा संपवल्या. इशान 317 रनसह या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारा चौथा बॅटर ठरला.

अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्याचा जलवा

अक्षर पटेल हा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा सर्वात विश्वासू खेळाडू ठरला. सेमीफायनलमध्ये त्याच्या बॉलिंगपेक्षा त्याने पकडलेल्या 2 अशक्य कॅचची जगभर चर्चा झाली. फायनलमध्ये त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर पॉवरप्लेमध्येच फिन ॲलन आणि ग्लेन फिलिप्ससारख्या मोठ्या माशांना गळाला लावला. अक्षरने 7 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या.

दुसरीकडे, हार्दिक पांड्याने एका परफेक्ट ऑलराउंडरची भूमिका बजावली. सेमीफायनलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून टीमला 250 च्या पार नेण्यापासून ते फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी विकेट्स काढण्यापर्यंत हार्दिकचा वाटा मोलाचा होता.

( नक्की वाचा : IND vs NZ : बार्बाडोसनंतर आता अहमदाबाद! रोहितची 'ती' परंपरा सूर्यानेही जपली; ऐतिहासिक प्रसंगाचा पाहा Video )

शिवम दुबेचा फिनिशिंग टच

शिवम दुबेने आपल्या ताकदीच्या जोरावर भारतीय मिडल ऑर्डरला एक वेगळीच उंची दिली. सेमीफायनलमध्ये त्याने 25 बॉलमध्ये 43 रन केले, पण त्याचा खरा हिसका फायनलमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये जेम्स नीशमच्या बॉलवर सलग प्रहार करत त्याने फक्त 8 बॉलमध्ये 26 रन चोपले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळेच भारताने टी20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर बनवला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com