आयपीएल 2025 मध्ये सर्व भारतीय खेळाडू व्यस्त असतानाच बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी एक कारवाई केली. टीम इंडियाचा सहाय्यक कोच अभिषेक नायरची (Abhishek Nayar) हकालपट्टी करण्यात आली. गौतम गंभीर (Gautam Gambhir) हेड कोच झाल्यानंतर अभिषेकची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या दोघांनी यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्समध्येही एकत्र काम केलंय. अभिषेकची अचानक हकालपट्टी का झाली? या कारवाईवर गंभीरचं मत काय होतं? असे प्रश्न विचारले जात होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'हिंदुस्थान टाईम्स' नं दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयनं गंभीरसोबतचा कोचिंग स्टाफ कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अभिषेक नायरचा करार न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे बीसीसीआयच्या या निर्णयाला गंभीरनंही मान्यता दिली. अभिषेकपेक्षा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल आणि दुसरा सहाय्यक कोच रायन टेन डोशेट यांना कायम ठेवण्यास गंभीरनं प्राधान्य दिलं. टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये या दोघांची नियुक्ती गंभीरच्या शिफारशीवरुनच झाली होती.
वरिष्ठ खेळाडूंची नाराजी
बीसीसीआयनं टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. त्यांनी ड्रेसिंग रुममधील अभिषेक नायरच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर नायरला करार वाढवण्यात येणार नसल्याचं कळवण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा? )
फिल्डिंग कोच टी दिलीप आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आलं, अशी माहिती आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार कोचिंग स्टाफमधील सदस्यांचा कलावधी 3 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्ट्रेंड अँड कडिशनिंग कोच पदासाठी एड्रियन ले रॉक्स यांची पुन्हा एकदा नियुक्ती होण्याची शक्यता आहे. रॉक्स यांची भारतीय टीमसोबत ही दुसरी टर्म असेल. यापूर्वी 2003 साली झालेल्या वर्ल्ड कपच्या दरम्यान ते या पदावर होते. भारतीय टीममध्ये फिटनेसची नवी संस्कृती आणण्याचं श्रेय रॉक्स यांना देण्यात येतं.