Is this the end for Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या एक वर्षापासून टेस्ट क्रिकेटमधून बाहेर आहे. 2023 च्या वनडे विश्वचषक फायनलनंतर त्याला दुखापत झाली आणि त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर राहिला. आता तो फिट झाला असला तरी, त्याची भारतीय टेस्ट संघात वापसी होईल की नाही, याबाबत अजूनही संशय आहे. बीसीसीआयने त्याला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत फिटनेससोबतच आपली फॉर्मही सिद्ध करण्यास सांगितले आहे.
शमी फिट झाल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला टी20 आणि वनडे संघात स्थान मिळाले आणि तो 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. मात्र, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या महत्त्वाच्या टेस्ट मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. याचे एक कारण तरुणांना अधिक संधी देणे हे असू शकते, अशी चर्चा आहे.
(नक्कीा वाचा- Rohit Sharma : मुंबईतील 3 BHK फ्लॅटएवढी आहे रोहितच्या गाडीची किंमत, 3015 नंबरचं रहस्यही उलगडलं)
युवा गोलंदाजांमुळे शमीची चिंता वाढली
आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासारख्या युवा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे शमीसाठी संघात परत येणे सोपे राहिलेले नाही. इंग्लंड टेस्ट मालिकेत आकाश दीपने 3 सामन्यांत 13 विकेट आणि प्रसिद्ध कृष्णाने 3 टेस्टमध्ये 14 विकेट घेऊन स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनुभवी मोहम्मद सिराज यानेही 5 सामन्यांत 23 विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहने 3 सामन्यांत 14 विकेट घेतल्या.
यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशिया कपसाठीही शमीला संधी मिळणे कठीण आहे. कारण जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या गोलंदाजांना पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन कोच गौतम गंभीर यांचाही भर युवा खेळाडूंना संधी देण्यावर आहे. त्यामुळे, शमीसाठी आता स्पर्धा खूप वाढली आहे.
( नक्की वाचा : Video : काळजी घे... रोहित शर्मानं केलं वचन पूर्ण, 4 कोटींची कार फॅन्सला दिली भेट! कारण काय? )
कोहली आणि रोहितच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह
मोहम्मद शमीसोबतच दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे कारकिर्दीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीसीसीआय त्यांच्या भवितव्याबद्दल कोणताही निर्णय घेण्याच्या घाईत नाही. पण, 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत रोहित 40 आणि कोहली 39 वर्षांचे होतील. त्यामुळे त्यांचे खेळणे शक्य होईल का? याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी भारत 'ए' संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
याशिवाय, लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि फलंदाज मनीष पांडे यांचेही आंतरराष्ट्रीय करियर जवळपास संपुष्टात आले आहे. चहल 2023 नंतर भारतासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर पांडेला 2015 मध्ये पदार्पण करूनही संघात नियमित जागा मिळवता आली नाही.