India vs Sri Lanka ODI Series : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वन-डे सीरिजची चर्चा अजुनही सुरु आहे. त्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 0-2 नं पराभव झाला होता. त्या सीरिजबाबत एक मोठी बातमी आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वन-डे सामना टाय झाला होता. हा सामना टाय झाल्यानंतर जे घडायला नको होतं, ते घडलं. अंपायर्सनी देखील या प्रकरणात त्यांची चूक मान्य केली आहे.
वास्तविक ही मॅच टाय झाल्यानंतर नियमांनुसार सुपर ओव्हर व्हायला हवी होती. पण, तसंच झालं नाही. त्यामुळे हा मुद्दा चर्चेचा विषय बनला. त्या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. भारतानं तो सामना जिंकला असता तर त्याचा सीरिजमधील निकालावरही परिणाम झाला असता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंपायर्सनी मान्य केली चूक
एका आघाडीच्या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार मैदानातील अंपायर जोएल विल्सन, रविंद्र विमलासिरी यांच्यासह मॅच रेफ्री रंजन मदुगले, टीव्ही अंपायर पॉल राफेल आणि फोर्थ अंपायर रुचिरा पैलियागुरुगे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतची चूक मान्य करण्यात आली आहे. प्लेईंग कंडिशन्सची व्याख्या चुकीच्या पद्धतीनं करण्यात आली. मॅच टाय झाल्यानंतर तिचा निकाल लागण्यासाठी सुपर ओव्हर्स घ्यायला हवी होती, असं या बैठकीत मान्य करण्यात आलं आहे.
कोणत्या कारणांमुळे झाला गोंधळ?
दोन्ही देशांच्या बोर्डानं सुपर ओव्हर खेळण्यास परवानगी दिली की नाही हे स्पष्ट नसल्यानं चारही अंपायर्सचा गोंधळ झाला आहे. पण, वेळ आणि परिस्थिती अनुकूल असेल तर सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल हे आता स्पष्ट झालं आहे.
( नक्की वाचा : धोनी आणि रैना 15 ऑगस्टलाच रिटायर का झाले? दोन्ही खेळाडूंच्या जर्सीशी आहे खास कनेक्शन )
टीम इंडियाला फटका
अंपायर्सनी केलेल्या या चुकीचा फटका टीम इंडियाला बसला. या निर्णयामुळे सीरिजची दिशा बदलली. तो सामना भारत जिंकण्याची शक्यता जास्त होती. यापूर्वी झालेल्या टी20 सीरिजमध्येही टाय सामन्यात भारतानं सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता.
भारतानं वन-डे सीरिजमधील पहिला सामनाही जिंकला असता तर टीम इंडियाच्या मनोबलावर त्याचा मोठा परिणम झाला असता. कदाचित टीम इंडियानं ती सीरिज देखील जिंकली असती. पण, अंपायर्सच्या चुकीमुळे तसं काहीही घडलं नाही.