भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने 2 चेंडू आणि 5 विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतरही मैदानावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भारतीय संघाने Asian Cricket Council (ACC) चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
पाकिस्तानच्या खेळाडूंनीही आपल्या ड्रेसिंग रूममधून बाहेर येण्यास विलंब केला. या दोन्ही घटनांमुळे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
(नक्की वाचा- IND vs PAK: पराभवानंतर पाकड्यांचा रडीचा डाव! प्रेझेंटेशनला दीड तास उशीर; सामना संपल्यानंतर मैदानात फुल ड्रामा)
या स्पर्धेची सुरुवातच तणावपूर्ण झाली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही पहिलीच मोठी स्पर्धा असल्याने दोन्ही देशांतील संबंध आधीच ताणले होते. या स्पर्धेतील ग्रुप आणि सुपर फोरच्या सामन्यांमध्येही भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.
फोटोशूटला नकार
अंतिम सामन्यापूर्वी होणारे ट्रॉफीसोबतचे पारंपरिक फोटोशूट देखील रद्द करण्यात आले होते. कारण भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि मोहसिन नक्वी यांच्यासोबत फोटोशूट करण्यास नकार दिला होता.
ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशननंतर भारतीय खेळाडू ट्रॉफीशिवायच जल्लोष करताना दिसले. कर्णधार सूर्यकुमार यादव तर हातात ट्रॉफी असल्याचा अभिनय करत सेलिब्रेशन रन करताना कॅमेऱ्यात कैद झाला. भारतीय संघाच्या या भूमिकेमुळे आणि पाकिस्तानच्या उशिरा येण्यामुळे बक्षीस समारंभात नुसता गोंधल पाहायला मिळाला. मात्र सामन्यानंतरही मैदानात भारतानेच बाजी मारली.