पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुर्दैवी कारणांमुळे मेडल जिंकण्याची संधी हुकलेली कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) भारतामध्ये परतली आहे. विनेशचं दिल्ली आंतराराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. मायदेशात झालेल्या भव्य स्वागतामुळे भारावून गेलेल्या विनेशनं मोठी घोषणा केली आहे.
काय म्हणाली विनेश?
विनेश फोगाटनं सांगितलं की, 'मला माझे देशवासीय, माझं गाव आणि कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम मिळालं आहे. त्यामुळे मला या धक्क्यातून सावरण्यात मदत होईल. मी कुस्तीमध्ये पुनरागमन करु शकते.
ऑलिम्पिक मेडल जिंकण्याची संधी हुकणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी मला किती वेळ लागेल हे माहिती नाही. मी कुस्तीमध्ये पुन्हा येईल की नाही हे माहिती नाही. पण, मला तुम्ही जे धैर्य दिलंय, त्याचा योग्य दिशेनं वापर करण्याची माझी इच्छा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनेशनं केली होती निवृत्तीची घोषणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये विनेशनं फायनलमध्ये धडक मारली होती. पण, फायनलपूर्वी झालेल्या टेस्टमध्ये तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले. त्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. हा विनेशसह संपूर्ण देशाला मोठा धक्का होता. या प्रकरणानंतर विनेशनं कृस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडं अपिल केलं होतं. पण, लवादानं भारताची याचिका फेटाळली. त्यामुळे विनेशचं ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं स्वप्न भगंल. या सर्व प्रकारानंतर विनेश पहिल्यांदाच मायदेशी परतली. त्यावेळी तिचं भव्य स्वागत करण्यात आलं.
( नक्की वाचा : प्रतीक्षा संपली! विनेश फोगाटच्या याचिकेवर CAS चा निर्णय जाहीर )
विनेशनं यावेळी तिच्या फॅन्सना बोलताना सांगितलं की, 'आपली लढाई संपलेली नाही. ही लढाई सुरु राहील. या लढाईत सत्याचा विजय व्हावा, अशी मी देवाकडं प्रार्थना करते. '