सोनेरी स्वप्न भंगलं! बाहुबलींना टक्कर, फायनलमध्ये एन्ट्री... पण पदरी निराशा 

Vinesh Phogat Disqualified : देशातील आंदोलनाची पार्श्वभूमी मागे ठेवून विनेश पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आणि तिथे पोहोचली. अंतिम सामन्यात पोहोचण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.

Advertisement
Read Time: 2 mins

मेहनतीचं फळ मिळतं, असं म्हणतात. मात्र याबाबत कुस्तीपटू विनेश फोगाट कम नशिबी ठरली. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होण्याआधी विनेशने कुस्ती महासंघाचे तत्कालिन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक आरोप झाल्यामुळे या प्रकरणाला देशभरात वेगळं वळण लागलं होतं. या आंदोलनात विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांवर राजकीय हेतूने आंदोलनात सहभागी झाल्याचेही आरोप झाले होते. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात विनेश आणि इतर मल्लांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचीही तयारी केली होती. सरतेशेवटी न्यायालयीन हस्तक्षेपानंतर कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली ज्यात ब्रिजभूषण यांना निवडणूक लढवण्यापासून मनाई करण्यात आली होती.

देशातील आंदोलनाची पार्श्वभूमी मागे ठेवून विनेश पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आणि तिथे पोहोचली. अंतिम सामन्यात पोहोचण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. प्री क्वार्टर सामन्यात चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या आणि मागील टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट यूई सुसाकीचा 3-2 ने पराभव केला. विनेशचे काका महावीर फोगाट यांना या सामन्याला गोल्ड मेडल मॅच असं म्हटलं होतं. 

(नक्की वाचा- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का; पदक निश्चित झालेली विनेश फोगाट अपात्र)

त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये तिचा सामना युक्रेनच्या ओकसाना लिवाच हीचा 7-5 ने पराभव केला आणि थेट सेमीफायनलमध्ये धडक मारली. सेमीफायनलमध्ये विनेशने क्यूबाची गुजमन लोपेझचा सहज पराभव केला. विनेशने या सामन्यात गुजमनचा 5-0 ने पराभव केला आणि ऑलिम्पिकची फायनल गाठली. 

(नक्की वाचा - vinesh phogat disqualified : विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?)

विनेशचा फॉर्म पाहता ती गोल्ड मेडलची प्रमुख दावेदार मानली जात होती. अवघा भारत आज गोल्ड मेडलची वाट पाहत होता. आजच्या सामन्यात पराभव झाला असता तरी विनेश फोगाटचं सिल्वर मेडल पक्कं होतं. ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर असताना तिला नशिबाने हरवलं. फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आणि अवघ्या देशाचं स्वप्न भंगलं.  

Advertisement

विनेश तू चॅम्पियन आहेस - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विनेश फोगाटला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. विनेश तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुमचा नेहमीच स्वभाव राहिला आहे.

PM Modi Tweet

Topics mentioned in this article