Wankhede Stadium's 50th Anniversary Celebrations : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या ऐतिहासिक वास्तूमध्ये वानखेडे स्टेडियमला खास स्थान आहे. कधीही न थांबणाऱ्या मुंबईकरांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट विश्वाला अनेक महान खेळाडू मुंबईनं दिले. या खेळाडूंनी क्रिकेट विश्व समृद्ध केलं. फॅन्सचं मनोरंजन केलं. त्यांच्या ऱ्हदयात जागा मिळवली. मुंबई आणि क्रिकेटचं नातं घट्ट आहे. त्यामुळेच मुंबई हे भारतीय क्रिकेटचं मुख्यालय आहे. जागतिक क्रिकेटचं पॉवर हाऊस आहे. मुंबईच्या क्रिकेटला ही ओळख वानखेडे स्टेडियमनं दिली आहे. फक्त मुंबईतीलच नाही तर जगभरातील क्रिकेट फॅन्सशी खास नातं असलेल्या वानखेडे स्टेडियमला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1975 साली हे स्टेडियम सुरु झालं. गेल्या पाच दशकात या स्टेडियमनं क्रिकेट फॅन्सना अनेक समृद्ध आठवणी दिल्या आहेत. याच स्टेडियममध्ये 2011 साली टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला. सचिन तेंडुलकरनं निवृत्ती स्विकारली. आयपीएल, T20 क्रिकेट हे शब्दही अस्तित्वात नव्हते तेव्हा रवी शास्त्रीनं सलग सहा सिक्स याच स्टेडियमवर लगावले होते.
कशी झाली वानखेडेची निर्मिती?
1970 च्या दशकात शेषराव वानखेडे हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते 1972 साली विधानसभेचे अध्यक्ष होते. वानखेडे यांना क्रिकेट प्रशासनाचाही अनुभव होता. ते बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष (BCA) होते. त्यावेळी मुंबईत ब्रेबॉर्न हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होतं. त्याची मालकी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडं (सीसीए) होती. बीसीए आणि सीसीए प्रशासनामध्ये सख्य नव्हतं. त्यांचे वारंवार खटके उडत असत.
( नक्की वाचा : सचिन तेंडुलकरच्या 51 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? )
विधानसभेतील काही तरुण आमदारांनी एका क्रिकेट सामन्यांचा प्रस्ताव वानखेडे यांच्याकडं ठेवला. त्यांना तो प्रस्ताव आवडला. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी वानखेडेंच्या नेतृत्त्वाखालील आमदारांच्या शिष्टमंडळानं सीसीएचे तत्कालीन अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची भेट घेतली.
विजय मर्चंट यांनी वानखेडे यांची मागणी फेटाळली. त्या बैठकीत जोरदार वाद झाला. त्यावेळी तुम्ही या पद्धतीनं अरेरावी केली तर बीसीएला नवं स्टेडियम बांधावं लागेल, असं वानखेडे यांनी सुनावलं. त्यावर तुम्ही घाटी लोक कधीही असं करू शकणार नाही, असं कुत्सित उत्तर विजय मर्चंट यांनी दिलं.
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
मर्चट यांनी भर बैठकीत केलेला अपमान वानखेडे यांना चांगलाच जिव्हारी लागला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटून सर्व प्रकार सांगितला. नव्या क्रिकेट स्टेडियमची त्यांच्याकडं मागणी केली. वसंतराव नाईक यांच्यासमोर मागणी मान्य करण्यापूर्वी एक मोठी अडचण होती. कारण, मैदान उभारण्यासाठी निधी आवश्यक होता.
या अडचणीवरच उत्तरही शेषराव वानखेडेंकडं होतं. तुम्ही फक्त भूखंड द्या, निधी आम्ही गोळा करतो, असं त्यांनी वसंतराव नाईक यांना सांगितलं. नाईक यांनी त्यानंतर मैदानासाठी जागा दिली. त्यानंतर पुढच्या 13 महिन्यामध्ये शेषराव वानखेडे यांनी क्रिकेट विश्वातील एका सुसज्ज मैदानाची निर्मिती केली.
मराठी माणसाचा अपमान झाल्यानंतर जिद्दीनं हे स्टेडियम उभं करणाऱ्या, या मैदानाच्या उभारणीसाठी कष्ट घेणाऱ्या शेषराव वानखेडे यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे.