वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. अंतिम सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने 20 षटकांत 156 धावा केल्या. पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वाधिक 41 धावा केल्या.
पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने 19.1 षटकांत विजय नोंदवला. भारताकडून अंबाती रायडूने निर्णायक अर्धशतक झळकावलं. रायडूच्या अर्धशतकावर टीम इंडियांने अंतिम सामना पाच विकेट्सने जिंकला.
भारतीय संघाने डावाची दमदार सुरुवात केली. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. मात्र आमिरने उथप्पाला 10 धावांवर बाद करत ही भागीदारी मोडली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला सुरेश रैना देखील स्वस्तात माघारी फिरला. त्याने केवळ 4 धावा केल्या.
त्यानंतर गुरकिरत सिंग मानने 34 धावा करत रायडूला चांगली साथ दिली. रायडूने 50 धावांचा निर्णायक खेळी केली. युसूफ पठाणने 30, युवराज सिंगने 15 धावा केल्या तर इरफान पठाण 5 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून आमिरने दोन तर सईद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी पाकिस्तानकडून कामरान अकमल आणि शर्जील खान यांनी डावाची सुरुवात केली. शर्जीलने केवळ 12 धावा केल्या. सोहेब मकसूद 12, शोएब मलिकने 41, युनूस खान 7 धावा, मिसबाह उल हकने 18 तर आमिर यामीनने 7 धावा केल्या. भारताकडून अनुरीत सिंगने 3 तर विनय कुमार, पवन नेगी आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.