वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) या 15 वर्षीय खेळाडूने 'ऑरेंज कॅप' आणि आयपीएल 2026 चा 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'चा किताब आपल्या नावावर केला आहे. मात्र, या यशाच्या शिखरावर असताना वैभवने लिलावावेळचा एक रंजक खुलासा केला आहे.
1.1 कोटी मिळूनही का नाराज होता वैभव?
आयपीएल लिलावाच्या इतिहासात जेव्हा राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत वैभवला 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले, तो एक ऐतिहासिक क्षण होता. मात्र, वैभवने राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की, एवढी मोठी रक्कम मिळूनही तो खूश नव्हता.
वैभवने म्हटलं की, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, जेव्हा माझी निवड झाली, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की, माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी (राजस्थान आणि दिल्ली) बोली का लावली? मी खूप चांगली फलंदाजी करतो. मी ट्रायल्समध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती, मग इतर संघांनी माझ्यावर बोली का लावली नाही?"
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
"देवाचे हजार वेळा आभार मानतो"
सुरुवातीला जरी वैभवच्या मनात ही नाराजी असली, तरी गेल्या दीड वर्षांत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग झाला आहे. वैभव म्हणाला, "आता मी दीड वर्षांपासून या संघासोबत आहे आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की, मला राजस्थान रॉयल्ससारख्या संघात पाठवल्याबद्दल मी देवाचे किमान हजार वेळा आभार मानले असतील. येथील प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, खेळाडू, व्यवस्थापन आणि फिजिओ हे सर्व एका कुटुंबासारखे आहेत. इथे आल्यावर घरच्यासारखे वाटते."
तो पुढे म्हणाला, "या फ्रँचायझीमध्ये आल्यानंतर मी किती आनंदी आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही. संघातील सर्व वरिष्ठ खेळाडू मला मार्गदर्शन करतात. काय चांगले आहे, मी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे, हे ते मला समजावून सांगतात. मला इथे खूप काही शिकायला मिळत आहे."
(नक्की वाचा- मित्राचा जेवणाचा डब्बा पाहून विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे धाव, पालकांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्याच्या आईला अटक)
IPL 2026 मध्ये 776 धावा आणि 237 चा स्ट्राईक रेट
यंदाच्या आयपीएल हंगामात वैभवने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अवघ्या 16 सामन्यांमध्ये 237 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने तब्बल 776 धावा कुटल्या. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणारी 'ऑरेंज कॅप' आणि स्पर्धेतील सर्वात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.