आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने शाळेत टिफिनमध्ये 'बीफ' आणल्याचा आणि ते इतर विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कृष्णई येथील हबरघाट हायर सेकेंडरी स्कूलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीचा धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कडक पावले उचलत, टिफिनमध्ये बीफ भरून देणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आईला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना 5 जून रोजी दुपारी लंच ब्रेकच्या वेळी घडली. इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या दोन हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप केला की, त्यांचे मुस्लिम वर्गमित्र घरून आणलेले बीफ खात होते आणि त्यांनी इतर वर्गमित्रांनाही ते खाण्याचा आग्रह केला. हा प्रकार समजताच हिंदू विद्यार्थ्यांनी याची माहिती तात्काळ शाळेचे शिक्षक मोहिबुल यांना दिली, ज्यांनी पुढे मुख्याध्यापकांना याबाबत सांगितले.
(नक्की वाचा- Crime News: सोशल मीडियावर 'शो-ऑफ' पडला महागात! प्रसिद्ध महिला युट्यूबरच्या घरावर दरोडा; कुटुंबाला खोलीत कोंडलं)
शिक्षकांनी प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न
पालकांचा आरोप आहे की, शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि संबंधित शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समितीला कोणतीही पूर्वकल्पना न देता, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पातळीवर किरकोळ शिक्षा करून हे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, संध्याकाळी जेव्हा मुले घरी पोहोचली, तेव्हा त्यांनी आपल्या पालकांना वर्गात घडलेला सर्व प्रकार सांगितला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी थेट कृष्णई पोलीस ठाणे गाठून अधिकृत तक्रार नोंदवली.
(नक्की वाचा- Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)
शाळेत जोरदार निदर्शने अन् पोलिसांची कारवाई
6 जून रोजी पीडित कुटुंबांना पाठिंबा देण्यासाठी विविध स्थानिक हिंदू संघटनांनी आणि नागरिकांनी शाळा परिसरात एकत्र येत जोरदार निदर्शने केली. दोषी विद्यार्थी आणि हे प्रकरण दाबणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मिळालेल्या कायदेशीर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित पाच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. तपासादरम्यान समोर आले की, सुमित आलम नावाच्या विद्यार्थ्याची आई नूर साहिदा बेगम यांनी मुलाच्या टिफिनमध्ये बीफ पॅक करून दिले होते. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नूर साहिदा बेगम यांना तात्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.