मानसी पिंगळे, प्रतिनिधी
Women's T20 World Cup 2024 : भारतीय महिला क्रिकेट टीमनं टी20 वर्ल्ड कपमध्ये खराब सुरुवातीनंतर कमबॅक केलं आहे. हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमचा पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मोठा पराभव झाला होता. या पराभवामुळे टीम सेमी फायनलपूर्वीच बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली. भारतीय टीमनं बुधवारी (9 ऑक्टोबर) रोजी झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर 82 रन्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय टीमचा नेट रन रेट +0.576 झाला आहे. भारतीय टीम सध्या त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय टीम सध्या त्यांच्या गटामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असली तरी त्यांचा सेमी फायनलमधील मार्ग अजूनही सोपा नाही. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकण्याचं आव्हान भारतीय टीमसमोर आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर महिला टीमचा सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित होईल. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर मात्र पुढील मार्ग खडतर होऊ शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर...
भारतानं शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर टीमचा सेमी फायनलमध्ये मोठ्या दिमाखात दाखल होईल. कारण त्या परिस्थितीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड प्रत्येकाचे 6 पॉईंट्स होतील. (4 सामन्यात 3 विजय) त्या परिस्थितीमध्ये नेट रन रेटच्या आधारावर टॉप 2 टीम सेमी फायनलमध्ये दाखल होतील. भारताचा सध्याचा नेट रनरेट (NRR) न्यूझीलंडपेक्षा जास्त आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झाला भारतीय हिंदू मुलीशी साखरपुडा, लग्नानंतर मुलगी स्विकारणार इस्लाम! )
ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला तर...
भारतीय टीमचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला तर टीमचा सेमी फायनलमधील प्रवेश इतर टीमच्या खेळावर अवलंबून असेल. त्या परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियन टीम ग्रुप टॉपर बनून सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. भारताच्या सेमी फायनल प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानविरुद्धची मॅचही जिंकावी लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचा श्रीलंका किंवा पाकिस्तानपैकी एका टीम विरुद्ध पराभव होणे आवश्यक आहे.
पाकिस्तानचे आणखी दोन सामने बाकी असून त्यांनाही सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण, पाकिस्तानचा रनरेट भारतीय महिला टीमपेक्षाही कमी आहे. न्यूझीलंडचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट टीमला सेमी फायनलमध्ये प्रवेश सोपा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे.