WPL News: विमेन्स प्रीमियर लीगचा (WPL) चौथा सीझन सध्या जोरात सुरू आहे, मात्र मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करावा लागणार असल्याने, डब्ल्यूपीएलच्या दोन सामन्यांना पुरेशी सुरक्षा देणे कठीण असल्याचे पोलिसांनी बीसीसीआयला (BCCI) कळवले आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण असल्याने, डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणारे विमेन्स प्रीमियर लीग (WPL) चे दोन महत्त्वाचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाण्याची शक्यता आहे.
कोणत्या सामन्यांवर होणार परिणाम?
निवडणुकीमुळे 14 आणि 15 जानेवारीच्या सामन्यांवर प्रेक्षक बंदी येण्याची शक्यता आहे.
- 14 जानेवारी - दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध यूपी वॉरियर्स (UPW)
- 15 जानेवारी (मतदानाचा दिवस) - मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध यूपी वॉरियर्स (UPW)
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, "निवडणुकीच्या कामामुळे पोलिसांवर ताण आहे. त्यामुळे १४ आणि १५ तारखेला प्रेक्षकांवर निर्बंध असू शकतात. यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, पण सामने वेळापत्रकानुसारच होतील." टाइम्स ऑफ इंडियाचे हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तिकीट विक्रीवर काय परिणाम?
सध्या अधिकृत तिकीट प्लॅटफॉर्मवर 14, 15 आणि 16 जानेवारीच्या सामन्यांची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. तथापि, 17 जानेवारीला होणाऱ्या डबल हेडर सामन्यांची तिकिटे विकली जात आहेत. 16 जानेवारीच्या (GG vs RCB) सामन्याला प्रेक्षक मिळणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
WPLचा पुढील प्रवास
मुंबईतील पहिला टप्पा संपल्यानंतर ही स्पर्धा वडोदरा (BCA स्टेडियम) येथे हलवली जाणार आहे. तिथे उर्वरित सामने आणि अंतिम फेरी खेळवली जाईल. डी. वाय. पाटील स्टेडियमवर महिला क्रिकेटला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, मुंबई इंडियन्सचा सामना रिकाम्या स्टँड्ससमोर होणे ही चाहत्यांसाठी मोठी निराशा असणार आहे.