Yuzvendra Chahal News: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2025 चा अंतिम सामना हरियाणा आणि झारखंड यांच्यात खेळला गेला. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल मैदानात दिसला नाही. त्याच्या अनुपस्थितीत झारखंडच्या फलंदाजांनी हरियाणाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. हरियाणाला या ऐतिहासिक सामन्यात चहलची उणीव प्रचंड भासली. अखेर या अनुपस्थितीचे कारण खुद्द चहलने सोशल मीडियावरून स्पष्ट केले असून त्याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती दिली आहे.
चहलची प्रकृती बिघडली
युझवेंद्र चहलने एका भावनिक पोस्टद्वारे सांगितले की, त्याला डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन्ही आजारांनी एकाच वेळी ग्रासले आहे. सामन्यापूर्वी त्याने लिहिले, "SMAT फायनलसाठी माझ्या हरियाणा संघाला हार्दिक शुभेच्छा. मला या ऐतिहासिक सामन्याचा भाग बनायचे होते, पण दुर्दैवाने मला डेंग्यू आणि चिकनगुनिया झाला आहे. माझी प्रकृती सध्या खालावली असून डॉक्टरांनी मला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मी लवकरच बरा होऊन मैदानावर पुन्हा ताकदीने पुनरागमन करेन."
पुनरागमन कधी होणार?
चहल नोव्हेंबर महिन्यात हैदराबादविरुद्धच्या ग्रुप सामन्यात खेळताना दिसला होता. या आजारपणामुळे तो 30 नोव्हेंबरपासून क्रिकेटपासून लांब आहे. चहलने आपल्या पुनरागमनाची निश्चित तारीख सांगितली नसली तरी, 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे सर्व त्याच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधारणेवर अवलंबून असेल.
(नक्की वाचा- Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)
दोन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर
युझवेंद्र चहल हा जरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकत असला तरी, भारतीय राष्ट्रीय संघात त्याला गेल्या काही काळापासून संधी मिळालेली नाही. ऑगस्ट 2023 नंतर त्याने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याचा संघात समावेश होता, पण त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नव्हती.
दरम्यान, चहलने इंग्लंडमध्ये नॉर्थम्पटनशायर (Northamptonshire) कडून काऊंटी क्रिकेट खेळताना शानदार कामगिरी केली आहे. त्याने वन-डे कपमधील पदार्पणातच 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच रेड-बॉल क्रिकेटमध्ये त्याने 4 सामन्यांत 19 विकेट्स घेत आपली छाप पाडली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला 2025 च्या हंगामासाठी पुन्हा एकदा करारबद्ध करण्यात आले आहे.