मीरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित शाळेतील एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट तसेच इतर कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर शाळेच्या कॅन्टीनमध्येही या पदार्थांवर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची नोटीस पालकांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाला मनसेनेने विरोध दर्शवला असून विद्यार्थ्यांवर कोणत्याही धर्माच्या प्रथा-परंपरा लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याची तयारीही मनसेने केली आहे. तर धर्म स्वतः जपावा, इतरांवर लादू नये, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीने मांडली आहे. या निर्णयावरून आता शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.