तरुण मुलं-मुली शाळा, महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात. काहींना लवकर संधी मिळते, तर काहींना अनेक महिने भटकावं लागतं. यातही काहीजणं मिळेल त्या पैशात रुजू होतात. करिअरच्या सुरुवातीच्या पातळीवर कंपन्यांकडून खूपच कमी रक्कम ऑफर केली जाते. अशातच एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यात एक छोटसं दुकान चालवणाऱ्याने मोठी ऑफर देऊ केली आहे.
ही जाहिरात एका मोमोजच्या दुकानावर लावण्यात आली आहे. ज्यात एका हेल्पर पाहिजे असल्याचं म्हटलं आहे. या हेल्परला दुकानदार 25,000 रुपये महिना पगार देण्यास तयार आहे. मोमोजच्या दुकानातील हेल्परसाठी 25 हजार रुपये महिना देऊ केला जात असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हेल्परला महिना 25 हजार दिलं जात असेल तर या छोट्याशा दुकानातील मालक किती कमावत असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रियांचा पाऊस...
25 हजार रुपये महिना पगार देऊ केला जात असल्याने मोमोजची मागणी लक्षात येते. सध्या या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिलंय की, मोमोजच्या दुकानात सध्या भारतातील सरासरी कॉलेजच्या तुलनेत चांगलं पॅकेज दिलं जात आहे. या पोस्टवर इंटरनेट वापरकर्त्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं की, आता अर्ज करतोय. दुसऱ्या युजरने लिहिलं की. 25 हजार पगारासह दररोज मोफत मोमोज खायलाही मिळतील.