Sankarshan Karhade: लोक विनाकारण त्रास देतायेत? संकर्षण कऱ्हाडेची आई आणि त्रागा करणाऱ्या मुलावरील कविता ऐकाच

Sankarshan Karhade Poem Video: आई आणि एका मुलामधील संवादाची सुंदर कविता सोशल मीडियावर व्हायरल झालीय. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची ही कविता तुम्ही ऐकलीय का?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Sankarshan Karhade Poem Video: संकर्षण कऱ्हाडेची कविता व्हायरल"
Sankarshan Karhade And Canva

Sankarshan Karhade Poem Video: बऱ्याचदा आपल्याला किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तीला लोकांकडून विनाकारण होत असलेल्या त्रासाचा सामना करावा लागतो. "मी स्वतःहून कोणालाच त्रास दिला नाही किंवा कोणत्याही गोष्टीची मी सुरुवात केली नाही, तरीही लोक मला का त्रास देतात?" असा अनुभव बहुतांश लोकांना येतो. कितीही दुर्लक्ष केलं तरी अशी परिस्थिती वारंवार उद्भवत असते. पण लोकांचा त्रास देणे काही थांबत नाही. तुम्हीही अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर आई आणि तिच्या मुलामधील संवादासंदर्भात अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली सुंदर कविता नक्कीच ऐका.

संकर्षण कऱ्हाडेची सकारात्मक ऊर्जा देणारी कविता | Sankarshan Karhade Viral Poem 

धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं
वस्तूंची फेकाफाकी करत घरामध्ये गेलं 
तिन्हीसांजेची वेळ, रात्र झाली नव्हती 
आई अशीच देवासमोर दिवा लावित होती 
जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं 
बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं 
म्हणाला खोटारडी आहेस तू आई... खोट्या मार्गावर चाललीस
आजपर्यंत तू माझ्याशी खोटच बोललीस 
आशीर्वाद देताना काय म्हणतेस, 'माझं काहीच अडणार नाही'
आणि माझ्याबाबतीत कधी वाईट मुळीच काही घडणार नाही 
आईपासून काय लपतंय, तिच्या लक्षात आलं 
तिनं बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं 
हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटामध्ये गेलं 
आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं ?
तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार 
सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार
त्यांच्या त्या अशांत... अस्वस्थ नजरा मला कळतात
जाणवतं मला ते माझ्यावरती ते खूप खूप जळतात 
बरं माझ्याविषयी माझ्याच माघारी बोलतात लोकांजवळ
मी पुढे जातोय ना माझा-माझा 
का पोटात यांच्या कळ?
बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय
आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला केलाय 
आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला 
मी तुला काय झालं? म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला
सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतायेत की हसतायेत 
कारण तुला पूर्ण करायची स्वप्नं ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायेत 
तुझ्या अपयशाची जी लोक पाहतायेत वाट ती सगळी स्वप्नं खोटी कर
दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर
आणि हे केलंस ना तू कधीच काही अडणार नाही 
आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काहीच घडणार नाही 
आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला  

(नक्की वाचा: Pregnant Woman Dance Video: 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने Stree 2 सिनेमातील गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले Wow)

संकर्षण कऱ्हाडेची ही कविता ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. त्यामुळे नको ते लोक आणि नको गोष्टींवर स्वतःची ऊर्जा खर्च करणं टाळा. तुम्हाला ज्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करा.