बंळुरूमध्ये रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये झालेला एक संवाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इंजिनिअर आकाश आनंदानी यांना रिक्षाचालकाने जे काही सांगितलं त्यानंतर ते आश्चर्यचकित झाले. 4 ऑक्टोबर रोजी आकाश आनंदानी यांनी रिक्षा पकडली. त्यांना रिक्षाचालकाच्या हातात ॲपल वॉच आणि कानात एअरपॉड्स दिसल्यामुळे त्यांनी त्याच्याशी बोलणे सुरू केले. या संवादात रिक्षाचालकाने जी माहिती दिली, ती ऐकून आनंदानी थक्क झाले.
रिक्षाचालकाने सांगितले की, त्याची 4 ते 5 कोटी रुपये किमतीची दोन घरे आहेत. ही दोन्ही घरे त्याने भाड्याने दिली आहेत. त्याला या भाड्यापोटी दरमहा 2 ते 3 लाख इतके उत्पन्न मिळते. इतकेच नाही, तर तो एका AI आधारित स्टार्टअपचा संस्थापक देखील आहे. तो फक्त वीकेंडला रिक्षा चालवतो आणि ते त्याचे पहिले काम मानतो.
(नक्की वाचा- Gujarat News: गरब्यादरम्यान जोडप्याचा Kissing VIDEO व्हायरल, नागरिकांच्या संतापनंतर देश सोडला)
आनंदानी यांनी X वर पोस्टमध्ये लिहिले की, "बंगळुरू वेडे शहर आहे. रिक्षाचालक भैय्या म्हणाले की, त्यांची 4-5 कोटींची 2 घरे भाड्यावर आहेत, ज्यातून त्यांना दरमहा 2-3 लाख रुपये मिळतात आणि ते AI स्टार्टअपचे संस्थापक/गुंतवणूकदार आहेत."
सोशल मीडियावर प्रतिक्रियांची धूम
आनंदानी यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून अनेकजण यावर आता प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कौतुक करत लिहिले की, "बंगळुरू स्टार्टअप कॅपिटल का आहे, याचे हेच उदाहरण आहे - रिक्षाचालक देखील गुंतवणूकदार आहेत!" तर दुसऱ्याने यामागे वेगळे कारण सांगितले: "शक्य आहे. बंगळुरूमध्ये एकटेपणा ही मोठी समस्या आहे. काही खूप उत्पन्न असणारे लोक देखील पैशांसाठी नाही, तर एकटेपणा घालवण्यासाठी छंद म्हणून टॅक्सी चालवतात."
अनेक युजर्सनी ही एक तयार केलेली कथा असल्याचे म्हटले. अनेक नेटकऱ्यांनी संशय व्यक्त केला असला तरी, आनंदानी यांनी मात्र त्यांची कथा खरी (True) असल्याचे ठामपणे सांगितले आहे.