भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. पण, त्याचवेळा उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये एक धक्कादायक घटना घडली. याबाबतच्या मीडिया रिपोर्टनुसार 14 वर्षांची मुलगी तिच्या घरच्यांसोबत उत्साहानं फायनल पाहात होती. या मॅचमध्ये विराट कोहली आऊट होता तिला मोठा धक्का बसला. या धक्क्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मॅच पाहताना या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना किती खरी आहे, याची माहिती तिचे वडिल आणि शेजाऱ्यांनी NDTV ला दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मॅचच्या दिवशी काय झालं?
मृत मुलीचं नाव प्रियांशी पांडेय आहे. ती 14 वर्षांची होती. ती देवारियाचे अधिवक्ता अजय पांडेय यांची मुलगी होती. मीडिया रिपोर्टनुसार 8 वी मध्ये शिकणारी प्रियांशी रविवारी तिच्या परिवारासोबत चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाहात होती. टीम इंडियाची पहिली विकेट पडल्यानंतर ती घाबरली होती. त्यापाठोपाठ विराट कोहली एक रनवर आऊट होताच प्रियांशीला मोठा धक्का बसला. ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
रविवारी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची फायनल मॅच होती. भारताला विजयासाठी 252 रन्सचं लक्ष्य होतं. संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेला विराट कोहली फायनलमध्येही मोठी खेळी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. विराट 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आऊट झाला. त्यानं फक्त 2 बॉलमध्ये 1 रन काढला.
( नक्की वाचा : Ravindra Jadeja : 'धन्यवाद' निवृत्तीच्या चर्चांवर रविंद्र जडेजानं सोडलं मौन, 4 शब्दांची पोस्ट Viral )
नेमकं काय घडलं?
याबाबतच्या वृत्तानुसार टीम इंडिया फायनलमध्ये अडचणीत असताना मुलीला हार्ट अटॅक आला. विराट कोहली फक्त एक रन काढून आऊट झाला होता. NDTV ची टीम या प्रकरणाचं सत्य शोधण्यासाठी मृत व्यक्तीच्या घरी देवारियामध्ये पोहोचली. त्यावेळी तिथं तिचे कुटुंबीय नव्हते. पण, त्यावेळी एका शेजाऱ्यानं त्या दिवशी काय झालं हे सत्य सांगितलं. त्याचबरोबर वडिलांनी फोनवर संपूर्ण घटना सांगितली.
मुलीचे वडील अजेय पांडेय यांनी सांगितलं की, पहिली इनिंग पाहिल्यानंतर ते मार्केटमध्ये गेले होते. त्यांची मुलगी दुसरी इनिंग टीव्हीवर पाहात होती. अचानक ती बेशुद्ध होऊन पडली. त्यांना घरातील मंडळींनी ही माहिती तातडीनं फोनवर सांगितली. हे समजताच ते पळत-पळत घरी आले आणि मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. कोणतंही पोस्टमार्टम न करताच मुलीचा मृतदेह घरी आणण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मॅच पाहिल्यामुळे मुलीला धक्का बसला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला हे खरं नाही. ही दुर्घटना घडली त्यावेळी भारताची एकही विकेट पडली नव्हती. विराट कोहली तर क्रिझवर देखील आला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.
प्रियांशीचे शेजारी अमित चंद्रा यांनी सांगितलं की, ही घटना घडली त्यावेळी ते प्रियांशीच्या घराबाहेरच होते. त्यांनी संपूर्ण घटना प्रत्यक्ष पाहिली आहे. प्रियांशीला हार्ट अटॅक आला त्यावेळी टीम इंडिया खराब खेळत नव्हती. मुलीला दुर्दैवानं मॅच पाहाताना हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.