
Ravindra Jadeja on Retirement : टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावलं. या विजयासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम बनली आहे. भारताचं हे तिसरं चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद आहे. भारतीय टीमनं यापूर्वी 2022 आणि 2013 साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु असतानाच टीम इंडियाच्या सीनिअर खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सर्वत्र सुरु होती. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासह (Rohit Sharma) रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु होती. रोहित शर्मानं फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली होती. त्यानंतर जडेजानं देखील या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी होती जडेजाची कामगिरी?
टीम इंडियाचा 'ऑल टाईम ग्रेट ऑल राऊंडर' अशी आता जडेजाची ओळख बनलीय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये जडेजानंच फोर लगावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. त्यापूर्वी त्यानं 10 ओव्हर्समध्ये फक्त 30 रन्स देत 1 विकेट घेतली होती.
जडेजा तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकणाऱ्या टीम इंडियाचा खेळाडू बनला आहे. यापूर्वी 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा तो सदस्य होता. मागील वर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कपनंतर रोहित आणि विराटप्रमाणे जडेजानंही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होणार अशी चर्चा होती.
Ravindra Jadeja's Instagram story.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 10, 2025
- SIR JADEJA IS HERE TO STAY...!!! 🇮🇳 pic.twitter.com/nTQNtNxEKo
रविंद्र जडेजानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत निवृत्तीवरील चर्चेवर उत्तर दिलं आहे. कोणतीही अनावश्यक अफवा पसरवू नका. धन्यवाद! असं जडेजानं या स्टोरीमध्ये म्हंटलं आहे.
( Rohit Sharma on Retirement : रोहित शर्माचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; 'हिटमॅन'ने पत्रकार परिषदेत काय म्हटलं? )
जडेजानं ही स्टोरी शेअर करत आपण वन-डे क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे त्याच्या सर्व फॅन्सना दिलासा मिळाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जडेजा आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा तो सदस्य आहे. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा ही अनुभवी जोडी बऱ्याच काळानंतर चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत या आयपीएलमध्ये एकत्र दिसेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world