Golden Silver Pani Puri: सोन्याचांदीचे भाव गगनाला भिडत असताना एका पाणीपुरी विक्रेत्याने खवय्यांसाठी चक्क सोन्या-चांदीची पाणीपुरी मार्केटमध्ये आणली आहे. पाणीपुरी, गोलगप्पे, पुचका अशा विविध नावाने जगभरात प्रसिद्ध असणारा हा पदार्थ देश-परदेशाच्या कानाकोपऱ्यातील खवय्यांना खूप आवडतो. साधारणपणे बटाटा किंवा बुंदीचे स्टफिंग आणि आंबटगोड-तिखट पाण्यासह पाणीपुरी खायला दिली जाते.
पण गुजरातमधील अहमदाबाद येथे एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने अनोख्या पद्धतीची सोन्या-चांदीची पाणीपुरी बाजारात आणली आहे. ज्यामध्ये सुकामेवा आणि थंडाईचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सोन्या-चांदीचा मुलामा असलेली ही पाणीपुरी सोन्याच्या थाळीमध्ये ग्राहकांना खायला दिली जाते. एका फूड ब्लॉगरने या पाणीपुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सोन्याच्या थाळीतील सोन्या-चांदीची पाणीपुरी
फूड ब्लॉगर्स खुशबू परमार आणि मननने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर या अनोख्या पाणीपुरीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पाणीपुरी विक्रेते पुरीमध्ये बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप मिक्स करत आहेत, पुरीमध्ये मधाचाही समावेश केला जात आहे. यानंतर थंडाईच्या छोट्या ग्लाससह पाणीपुरी सर्व्ह करण्यात आली. प्रत्येक पुरीवर सोन्या-चांदीचा वर्ख लावून प्लेटची सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. दरम्यान फूड वेंडर Shareatने स्वच्छ आणि लाइव्ह-फ्राइड पाणीपुरी उपलब्ध करणारे देशातील पहिले विक्रेते असल्याचा दावा केला आहे.
पाहा व्हिडीओ
...पण युजर्स भडकले
सोन्याचांदीच्या पाणीपुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांनी विक्रेत्याच्या या अनोख्या संकल्पनेचे कौतुक केले आहे तर काहींनी खिल्ली उडवल्याचेही पाहायला मिळाले. एका युजरने म्हटले आहे की, 'पाणीपुरीला महालाची राणी होऊ देऊ नका'. तर आणखी एकाने लिहिले की, 'बप्पी लहिरी पाणीपुरी'. एका युजरने गंमतीशीर कमेंट करत म्हटले की, 'हे मोफत देखील खाणार नाही, पाणीपुरीची रेसिपीच बदलली आहे'.
आणखी वाचा
टायटॅनिकचे 112 वर्षे जुने मेनू कार्ड व्हायरल, दुर्घटनेपूर्वी प्रवाशांनी या पदार्थांचा घेतला आस्वाद
पोट दुखतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली, डॉक्टरांनी केले भलतेच उपचार, पुढे काय झाले?