उन्हाची तीव्रता वाढल्यानं सध्या देशभरातील जनजीवन व्यस्त झालंय. बहुतेक राज्यातील शाळा उन्हामुळे बंद आहेत. काही ठिकाणी शाळा सुरु आहेत तिथं मुलांची उपस्थिती रोडावलीय. मुलांनी शाळेत यासाठी प्राथमिक शाळेतील मुलांनी भन्नाट युक्ती केलीय. त्यांनी शाळेतील एका वर्गात पाणी भरुन त्याचं स्विमिंग पूलमध्ये रुपांतर केलंय. मुख्याध्यापकांच्या या युक्तीचा शाळेला फायदा झाला आहे. मुलं स्विमिंग पुलमध्ये पोहण्यासाठी तसंच पाण्यात मस्ती करण्यासाठी शाळेत येत आहेत. मुलांचा स्विमिंग पूलमध्ये मजा करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील महसोनापूरच्या प्राथमिक शाळेत हा स्विमिंग पूल बनवण्यात आलाय. या भागात सध्या 40 ते 42 डिग्री सेल्सियस तापमान आहे. उष्णतेच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी पालक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी शाळेतील हजेरी वाढावी यासाठी वर्गाचं रुपांतर स्विमिंग पूलमध्ये केलं.
शाळेचे मुख्याध्यापक वैभव राजपूत यांनी ANI ला सांगितलं की, 'शाळेतील एका वर्गात पाणी भरुन त्यामध्ये स्विमिंग पूल बनवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा पूर्ण आनंद लुटत आहेत. त्यांचा आनंद अवर्णनीय आहे. मुलांनी यावेळी पोहण्याचाही प्रयत्न केला.
( नक्की वाचा : घटस्फोस्टानंतर लेकीची काढली मिरवणूक, वडिलांनी वाजत-गाजत नेलं घरी )
'सध्या गावात गव्हाची कापणी सुरु आहे. त्यामुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठवत नव्हते. त्यांचा अभ्यास बुडत होता. मुलांनी शाळेत यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर मुलांनी शाळेत यावं यासाठी आम्ही हा मार्ग काढला, अशी माहिती शाळेतील शिक्षक ओम तिवारी यांनी दिली.