भारतात दररोज हजारो रेल्वे स्थानकांवरून शेकडो गाड्या ये-जा करतात. मात्र, पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात आगळेवेगळे स्टेशन ठरले आहे. या स्टेशनवर वर्षभराचे 365 दिवस सामसूम असते आणि केवळ दोनच विशेष दिवशी इथे प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते.
कुठे आहे हे अनोखे स्टेशन?
हुसैनीवाला रेल्वे स्टेशन हे भारत-पाकिस्तान सीमेजवळ (हुसैनीवाला बॉर्डर) स्थित आहे. या रेल्वे लाईनचे हे शेवटचे स्टेशन आहे. म्हणजेच यापुढे रेल्वे मार्ग संपतो. ज्या दिशेने ट्रेन येते, त्याच दिशेने तिला परत फिरावे लागते.
'त्या' दोन दिवसांचे महत्त्व काय?
- 23 मार्च (शहीद दिन): 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा स्मृतिदिन असतो. या दिवशी हुसैनीवाला येथील स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे ही विशेष गाडी चालवते.
- 13 एप्रिल (बैसाखी): पंजाबचा मुख्य सण असलेल्या बैसाखीच्या दिवशी या सीमेवर मोठा मेळा भरतो, त्यानिमित्ताने दुसरी फेरी होते.
(नक्की वाचा- Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)
पाहा Video:
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
एका प्रवाशाने या स्टेशनचा व्हिडिओ 'X' आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो सांगतो की, "हे तेच ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे ट्रेन फक्त दोनदाच येते."
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक युजर्सनी या स्टेशनचे नाव बदलून 'शहीद भगतसिंग रेल्वे स्टेशन' करण्याची मागणी केली आहे. काहींनी हे स्टेशन पर्यटनासाठी वर्षभर खुले ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world