- मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News: लहान मुले खेळताना कधी काय करतील? याचा नेम नाही. पण कधीकधी खेळताना कळत-नकळत केलेल्या गोष्टी त्यांच्यावर जीवावरही बेतू शकतात. अशीच एक थरारक घटना जळगावमध्ये घडली आहे. साडेतीन वर्षांची चिमुकली सानिया आपल्या घरात खेळत असताना तिचे डोकं अॅल्युमिनिअमच्या एका अरुंद भांड्यात अडकलं. हे पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर डॉक्टरांनी एका प्लंबरच्या मदतीने अत्यंत कौशल्याने हे भांडं कापून सानियाची सुटका केली.
नेमकं काय घडलं?
सानिया घरात खेळत असताना तिने गंमत म्हणून अॅल्युमिनियमचं एक भांडं डोक्यावर घेतलं. पण काही वेळातच ते भांडं तिच्या मानेपाशी घट्ट अडकलं. पालकांनी ते काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. उलट सानिया वेदनेने रडू लागली. वेळ न घालवता पालकांनी तिला तशाच अवस्थेत डॉ. मिनाज पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं.
(नक्की वाचा: Kalyan Video: धक्कादायक! ठाणे-कल्याण लोकल बनली नशेडिबाजांचा अड्डा; भरदिवसा डब्यात काय घडलं? पाहा हा व्हिडीओ)
प्लंबर, कटर आणि ऑपरेशन सानिया
डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने एका प्लंबरला बोलावून घेतलं. हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचं होतं, कारण कटरचा वापर करताना चिमुकलीच्या डोक्याला किंवा मानेला इजा होण्याची भीती होती. सुरक्षा म्हणून सानियाच्या डोक्याला आणि भांड्याच्या मधे पुठ्ठा, प्लास्टिकचा तुकडा आणि रुमाल सरकवण्यात आला. प्लंबरने कटरच्या मदतीने भांड्याला चीर पाडण्यास सुरुवात केली. इकडे सानिया वेदनेने तळमळत होती, पण डॉक्टरांची टीम पालकांना धीर देत काम करत होती. कटरने भांड्याचा एक भाग कापून काढला, पकडीने भांडं वाकवलं, पण डोकं काही बाहेर येत नव्हतं.
अकरा मिनिटांचा थरारअखेर डॉक्टरांनी सानियाला झोपवून भांड्याला दुसऱ्या बाजूने पुन्हा चीर पाडली. चौघांनी मिळून डोकं आणि भांडं विशिष्ट कोनात फिरवलं आणि अकरा मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर सानियाचं डोकं भांड्यातून सुरक्षित बाहेर आलं. सुटका होताच सानियाने आपल्या वडिलांना मिठी मारली. "त्या 11 मिनिटांत एक छोटीशी चूकही मोठी इजा करू शकली असती, पण सर्वांच्या सहकार्याने सानिया सुखरूप आहे," अशी भावना डॉ. मिनाज पटेल यांनी व्यक्त केली.