कार्यालयातील वातावरण चांगलं नसेल, वरिष्ठ छळवणूक करत असतील तर कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो. अनेकदा कर्मचारी उद्वीगनतेतून त्यांच्या वरिष्ठांना शिवीगाळ करतात, मारहाण करतात तर काहीजण घर चालवण्यासाठी हा त्रास सहन करत निमूटपणे काम करत राहतात. अशा वातावरणातून ज्यांची सुटका होते ते प्रचंड खूश असतात.
यातले काहीजण आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांना शेवटच्या दिवशी मोठी पार्टी देतात. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळलेल्या पुण्याच्या अनिकेतने मात्र एक वेगळाच मार्ग निवडला. त्याने शेवटच्या दिवशी वरिष्ठांना कार्यालयाबाहेर बोलावले आणि ढोलवादकांना बोलावून त्यांना जोरजोरात ढोल वाजवायला सांगितले. यानंतर अनिकेतने देहभान विसरून तुफान डान्स केला. हा सगळा प्रकार त्याचे वरिष्ठही पाहात होते. त्यांना काय करावं हेच कळेनासं झालं होतं.
पाहा Video:
अनिकेतच्या डान्सचा व्हिडीओ अनीश भगत नावाच्या व्यक्तीने इस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने अनिकेतची छोटी मुलाखतही या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. यात अनिकेतने म्हटलंय की त्याला पगारवाढ मिळत नव्हती. वरिष्ठ त्याला नीट वागणूक देत नव्हते. म्हणून अनिकेतला त्याच्या मित्रांनी वरिष्ठांसमोर ढोलच्या तालावर नाचण्याची आयडिया दिली. वरिष्ठांना अनिकेतचा हा निर्णय अर्थातच आवडला नाही. त्यांनी अनिकेत आणि ढोलवादकांवर आपला संताप व्यक्त केला आणि थोडीफार धक्काबुक्कीही केली.
अनीश भगतने व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलंय की, तुमच्यापैकी अनेकजणांची अशीच भावना असेल. आजकाल कार्यालयीन वातावरण गढूळ, टॉक्सिक होत चालले आहे. कर्मचाऱ्यांना नीट वागणूक दिली जात नाही. मला आशा आहे की हा व्हिडीओ अनेकांना प्रेरीत करेल. अनिकेत त्याच्या पुढील वाटचालीसाठी सज्ज झाला आहे.
अनीशने हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता आणि तो १० लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. त्याच्या या पोस्टवर लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एकाने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की 'माहिती नाही का मात्र मला हा व्हिडीओ पाहून खूप बरं वाटतंय' दुसऱ्या एकाने म्हटलंय की 'हा डान्स पाहून मला बरं वाटलं.' अन्य एका व्यक्तीने म्हटलंय की 'तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सकारात्मक आणि उत्साहाने सळसळणारी व्यक्ती आहे.' तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे ? आम्हाला नक्की कळवा.