Mumbai Local journey Shocking Video: मुंबई म्हणजे मायानगरी. स्वप्नांचे शहर.. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक भागातून असंख्य लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात. इथं येणाऱ्या प्रत्येकाला हे शहर आपलंसं करते. पण हा स्वप्नांचा प्रवास काही सोपा नसतो. कारण मुंबईत कुठेही जायचं म्हटलं की गाठावी लागते ती लोकल. या लोकलचा जीवघेणा प्रवास ज्याला जमला तोच मुंबईत टिकला असं म्हणतात.
आपली मुलगी, सून ऑफिसला जाते कशी?
मुंबई लोकलमधून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच पळावे लागते. ऑफिसला जाणाऱ्या तरुणी, महिला यांची या गर्दीत चांगलीच दमछाक होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई लोकलच्या गर्दीचे भयानक वास्तव एका तरुणीने दाखवले आहे. आपली मुलगी, सून ऑफिसला जाते, पैसे कमावते असं अभिमानाने सांगतो, पण ती पोहोचते कशी? यामागची धडपड अन् संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
VIDEO: हेल्मेट का घातले नाही? काकांनी सांगितलं 'असं' कारण; पोलिसांनी हातच जोडले, व्हिडिओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीने तिच्या लोकल प्रवासाची कहाणी सांगितली आहे. ती तरुणी ठाणे स्टेशनवर उभी आहे. स्टेशनवर इतकी गर्दी आहे की तिला एकही ट्रेन पकडता येत नाहीये. एका तासात तीन ते चार ट्रेन सोडल्या मात्र चढता आलं नाही, असं ती म्हणते. आमची मुलगी सून कमवायला जाते, पण ती कशी जाते हे मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवणार आहे, असं म्हणत तिने दररोज लोकलच्या गर्दीत धक्के खाणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांचा संघर्षच मांडला आहे.
चार ट्रेन सोडल्या, गर्दी कमी होईना ...!
काही वेळाने प्लॅटफॉर्मवर लेडीज स्पेशल ट्रेन येते, त्या ट्रेनमध्ये तरी जागा मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र तिथेही महिलांची बसण्यासाठी तुफान गर्दी दिसतेय. काही महिला ट्रेन पकडण्याच्या नादात पडतात, लोंबकळत प्रवास करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. थोडक्यात तरुणीच्या या व्हिडिओने मुंबईकरांचा संघर्षच दाखवला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
तरुणीचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देत आम्हीही असाच संघर्ष करत असल्याचे सांगितले आहे. काही नेटकऱ्यांनी मुंबईची लोकसंख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे, त्यामुळे अशी गर्दी होत असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी रेल्वे प्रशासनावरच आपला राग व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world