Mumbai Rental Shock: मुंबईमध्ये भाड्याने घर शोधताना घरमालकांच्या वेगवेगळ्या अटींबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण आता एका महिलेला चक्क तिच्या न्यूमरोलॉजी नंबरमुळे (अंकशास्त्र) घर नाकारण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सर वाग्मिता सिंह हिने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे हा दावा केला असून, सध्या या विषयावर इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
वाग्मिता सिंह हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, तिच्या एका मैत्रिणीने मुंबईत भाड्याने फ्लॅट पाहण्यासाठी एका घरमालकिणीची भेट घेतली होती. ती घरमालकीण दिसायला अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटत होती. मात्र, भेटीच्या सुरुवातीलाच तिने मैत्रिणीला एक अजब प्रश्न विचारला, "तुझा नंबर काय आहे?" मैत्रिणीला सुरुवातीला वाटले की ती फोन नंबर विचारत आहे, पण नंतर घरमालकिणीने स्पष्ट केले की तिला जन्मतारखेवरून काढला जाणारा न्यूमरोलॉजी नंबर (मूलांक) हवा आहे.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
काय ठरला ठरला कळीचा मुद्दा?
इन्फ्लुएन्सरच्या दाव्यानुसार, त्या सुशिक्षित घरमालकिणीने स्वतःच्या घराचा नंबर आणि त्या मुलीच्या न्यूमरोलॉजी नंबरची तुलना केली. तिने सांगितले की, तिच्या घराचा संबंध 4 या आकड्याशी आहे, तर त्या मुलीचा न्यूमरोलॉजी नंबर 7 आहे. अंकशास्त्रानुसार हे दोन्ही आकडे एकमेकांशी जुळत नसून हे कॉम्बिनेशन वाईट आहे, असा दावा करत त्या महिलेने मुलीला फ्लॅट भाड्याने देण्यास स्पष्ट नकार दिला.
या अजब प्रकारामुळे धक्का बसलेल्या वाग्मिताने व्हिडिओमध्ये उपरोधिकपणे "इस मेंटल इलनेस को मैं क्या नाम दूं" हे गाणे गात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नेटीझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सनी मुंबईतील घरमालकांवर आणि या अजब अटींवर मिश्कील टिप्पण्या करायला सुरुवात केली आहे. एका युझरने गमतीने लिहिले की, "अरे, हे तर राहू-केतूचे कॉम्बिनेशन होते, आंटीने एक सर्वोत्तम भाडेकरू गमावला." तर दुसऱ्या एका न्यूमरोलॉजी समजणाऱ्या युझरने यावर भाष्य करताना लिहिले की, "4 आणि 7 हे खरं तर सर्वात मजबूत कॉम्बिनेशन मानले जाते."
दरम्यान, आणखी एका युझरने मुंबईतील घरांच्या विचित्र परिस्थितीवर निशाणा साधत कमेंट केली की, "या शहरात आता टॅरो कार्ड बघणारे मालकही राहतात." मुंबईत भाडेकरू निवडताना घरमालक किती वेगवेगळ्या आणि अजब निकषांचा वापर करतात, यावर आता सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मात्र, या दाव्याची अद्याप कोणतीही अधिकृत पडताळणी झालेली नाही.
इथे पाहा संपूर्ण VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world