माणुसकीला लाजवेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रेमी जोडप्याला शिक्षा देताना क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. तरुण आणि तरुणीला जनावरांप्रमाणे नांगराला बांधून शेतात नांगरणी करायला लावली. एवढेच नाही, तर त्यांना काठ्यांनी मारहाणही करण्यात आली. एवढ्यावरही मन न भरल्याने नंतर मंदिरात नेऊन त्यांचे 'शुद्धीकरण' करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
ओडिशातील ही धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे समोर आली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील कंजामझिरा गावात प्रेम केल्याबद्दल या जोडप्याला तालिबानी शिक्षा देण्यात आली. त्यांचा एकमेव 'गुन्हा' म्हणजे त्यांनी गावाच्या सामाजिक परंपरांविरुद्ध जाऊन लग्न केले होते.
( नक्की वाचा : Radhika Yadav: 17 लाख भाडं, मुलीला 2 लाखांचं टेनिस रॅकेट! राधिकची हत्या करणाऱ्या वडिलांबाबत धक्कादायक खुलासा )
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. गावात अशा जवळच्या नात्यात लग्न करणे निषिद्ध मानले जाते. गावकऱ्यांना या लग्नाबद्दल कळले, तेव्हा त्यांनी दोघांना तालिबानी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
पंचायतीच्या आदेशानुसार, बांबू आणि लाकडाचा एक नांगर बनवण्यात आला. मुलगा आणि मुलीला त्या नांगराला जनावरांसारखे बांधण्यात आले. त्यानंतर शेतात त्यांना नांगर ओढायला लावला. या अमानवी शिक्षेनेही मन न भरल्याने, काठ्यांनी दोघांना मारहाणही करण्यात आली. व्हिडिओमध्ये गावकरी दोघांकडून बैलांप्रमाणे नांगर ओढवून घेताना आणि त्यांना काठीने मारताना दिसत आहेत.
त्यांची ही तालिबानी शिक्षा इथेच थांबली नाही. शेतात जनावरांसारखी नांगरणी करून घेतल्यानंतर दोघांना मंदिरात नेण्यात आले. त्यांचे 'पाप' धुण्यासाठी कथितरित्या 'शुद्धीकरण' देखील करण्यात आले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मानवाधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.