India Strike in Pakistan: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्ताननं भारतीय सैन्याच्या 15 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानं तो प्रयत्न निष्फळ केला. त्याचबरोबर भारतानं या 'ना पाक' कृत्याला चोख उत्तर दिलं आहे. त्यानंतर पाकिस्तान सैन्य, सरकार तसंच नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. भारतानं केलेल्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील भीती दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
संसदेत खासदार रडले
भारतानं केलेल्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे माजी सैन्य अधिकारी मेजर ताहिर इक्बाल पाकिस्तानी संसदेमध्ये रडले. त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं की, 'मी प्रार्थना करतो. अल्लाहनं पाकिस्तानचं संरक्षण करावं.' या व्हायरल व्हिडिओमध्ये आपणच गुन्हेगार असल्याचं इक्बाल यांनी कबूल केलंय, त्याबद्दलही ते माफी मागत आहेत.
नागरिकांचा सैन्यावर संताप
रावळपिंडीमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक स्थानिक तरुण पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांवर अतिशय संतापलेला आहे. इथं ड्रोन हल्ला झाला आहे. लोकं दहशतीमध्ये आहेत. पण, पोलीस आकाशातून वीज पडल्याचं सांगत आहेत, असं सांगत या तरुणानं पाकिस्तानमधील भीषण अवस्था सांगितली आहे.
भारतानं घुसून मारलं
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये पाकिस्तानी तरुणानं सांगितलंय की, भारतानं पाकिस्तानवर 24 क्षेपणास्त्र टाकले. पण, धक्कादायक गोष्ट म्हणजे आम्ही एकही क्षेपणास्त्र अडवू शकलो नाहीत. त्यांनी सर्व नियोजित ठिकाणांना लक्ष्य केलं. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. स्वत:च्या चुका मान्य करण्याच्या ऐवजी पाकिस्तानी मीडिया खोटारडा प्रचार करत असल्याचं या तरुणानं सांगितलं.
गुरुवारी रात्री पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 8 मे रोजी सकाळी भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवरची एअर डिफेन्स रडार आणि डिफेन्स सिस्टमला लक्ष्य केले. लाहोरमधील पाकिस्तानचे एअर डिफेन्स नष्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.