- Viral News: पुण्यात भाड्यावर मिळू लागलेत बॉयफ्रेंड
- एकाकीपणामुळे त्रस्त तरुणी आणि महिलांसाठी नवी सेवा
- भाऊदेखील भाड्याने मिळणार
पुणे तिथे काय उणे ही म्हण आता इतकेवेळा बोलून झालीय की ती आता बोथट झाली आहे, मात्र तरीही ही म्हण आजही अनेक गोष्टींमध्ये लागू होते. पुण्यामध्ये अनेक चित्र-विचित्र घटना घडतात की या घटनांमुळे ही म्हण कालबाह्य होत नाही. आता पुण्यात एक अशी गोष्ट सुरू झाली आहे, ज्याची कल्पना कदाचित कोणी स्वप्नातही केली नसेल. जपानमध्ये प्रसिद्ध असलेली 'रेंट-अ-रिलेशन' (Rent-a-Relation) ही संकल्पना आता पुण्यात प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
नक्की वाचा: Pune News: 'हे नेते दळभद्री यांनी लोकांवर अन्याय केलाच पण देवांवर ही अन्याय केला'
पुण्यातील काही भागांत सध्या एक पत्रक वाटले जात असून, त्यात चक्क भाड्याने नाती (भाड्यावर बॉयफ्रेंड आणि भाऊ) मिळतील, असे सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका युजरने या जाहिरातीचे पत्रक पोस्ट केले आहे. हे पत्रक शेअर करताना त्याने कॅप्शन दिले की, "मार्केटमध्ये नवीन startup!!! बिनभांडवली धंदा सुरू झालाय आणि तेही पुण्यात.. 😂 पुण्याचं जपान होणार आता 😅😅 पुणे तिथे काय उणे 🤣🤣". ही पोस्ट पाहता पाहता व्हायरल झाली असून, पुणेकरांनी यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
सेवा फक्त तरुणी आणि महिलांसाठी
या जाहिरातीमध्ये म्हटले आहे की एकाकी वाटत असेल, कोणी बोलण्यासाठी सोबत नसेल. गोंधळलेले, घाबरल्यासारखे किंवा तणावग्रस्त वाटत असेल आणि कुठे तरी जावे वाटत असेल मात्र सोबतीला कोणी नसेल तर आम्ही तुम्हाला भाड्याचे मित्र, भाड्याचे बॉयफ्रेंड आणि भाड्याचे भाऊ मिळवून देण्यास मदत करू. या सेवेची वैशिष्ट्येही देण्यात आली आहे. ही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- एकाकीपणा दूर करणे: जर तुम्हाला तणावग्रस्त किंवा गोंधळल्यासारखे वाटत असेल, तर तुम्हाला साथ देणे.
- निखळ मैत्री: तुम्ही कोणाशीही मोकळेपणाने बोलू शकता, मनातल्या गोष्टी शेअर करू शकता.
- इव्हेंट पार्टनर: फिल्म बघण्यासाठी, कॉफी पिण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला सोबत मिळेल.
- मानसिक आधार: आम्ही तुमचे ऐकून घेऊ, तुम्हाला कशाचेही दडपण देणार नाही किंवा कोणत्याही विशिष्ट चष्म्यातून पाहणार नाही.
समजून घेऊ, आधार देऊ!
या जाहिरातीमध्ये पुढे म्हटलंय की आम्ही तुमचं ऐकू, तुम्हाला विशिष्ट चष्मातून पाहणार नाही, तुमच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. आम्ही तुमचे ऐकू, तुम्हाला आधार देऊ आणि तुम्हाला पाठिंबा देऊ. एक निखळ मैत्री जपू असं आश्वासन या जाहिरातीमध्ये देण्यात आले आहे. जपानमध्ये अशा प्रकारची भाड्याने माणसं मिळण्याची सेवा खूप आधीपासून सुरू आहे. तिथे लोक सण-उत्सव साजरे करण्यासाठी किंवा एकाकीपणा दूर करण्यासाठी आई, वडील, मित्र किंवा जोडीदार भाड्याने घेतात. आता पुण्यातील या जाहिरातीमुळे "पुण्याचं जपान होणार का?" असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.