Viral News : लग्नसोहळा म्हटला की डोळ्यासमोर येते ती रोषणाई, पाहुण्यांची लगबग आणि आनंदाचे वातावरण. नवरी मुलगी तर आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या क्षणाचा आनंद घेण्यात मग्न असते.
पण सोशल मीडियावर सध्या एका अशा नवरीची चर्चा रंगली आहे, जिने लग्नाचे विधी संपताच हातात अक्षता किंवा फुलांऐवजी थेट लॅपटॉप पकडला होता. लाल रंगाचा भरजरी लग्नाचा पोषाख अंगावर असतानाच या नवरीने कंपनीसमोर आलेले एक मोठे संकट अवघ्या काही मिनिटांत दूर केले. तिची ही कृती पाहून सध्या इंटरनेटवर दोन गट पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
कोयल एआय या स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेहुल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. मेहुल यांनी त्यांची बहीण आणि कंपनीची सह-संस्थापक गौरी अग्रवाल हिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये गौरी लग्नाच्या कपड्यांत बसून लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे.
मेहुल यांनी सांगितले की, लग्नाचे विधी संपून अवघ्या 10 मिनिटे झाली होती आणि त्याच वेळी कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये एक मोठी तांत्रिक अडचण म्हणजेच बग निर्माण झाला. ही अडचण इतकी गंभीर होती की गौरीला त्याच अवस्थेत कामाला लागावे लागले.
स्टार्टअप विश्वातील वास्तव
मेहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये स्टार्टअप सुरू करणे आणि ते चालवणे किती आव्हानात्मक असते, याचे वास्तव मांडले आहे. लोक स्टार्टअपच्या जगाकडे खूप ग्लॅमरस पद्धतीने पाहतात, पण प्रत्यक्षात त्यामागे प्रचंड कष्ट आणि धावपळ असते, असे त्यांनी म्हटले आहे.
लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी काम करत असल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी या दोघांनाही चांगलेच ओरडले होते. हा केवळ फोटो काढण्यासाठी केलेला स्टंट नव्हता, तर ती कामाची गरज होती, असेही मेहुल यांनी स्पष्ट केले. जेव्हा लोक आम्हाला विचारतात की तुम्ही यशस्वी कसे झालात, तेव्हा मी त्यांना हेच उदाहरण देईन, असे मेहुल यांनी अभिमानाने सांगितले.