Viral News : लग्नसोहळा म्हटला की डोळ्यासमोर येते ती रोषणाई, पाहुण्यांची लगबग आणि आनंदाचे वातावरण. नवरी मुलगी तर आपल्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या क्षणाचा आनंद घेण्यात मग्न असते.
पण सोशल मीडियावर सध्या एका अशा नवरीची चर्चा रंगली आहे, जिने लग्नाचे विधी संपताच हातात अक्षता किंवा फुलांऐवजी थेट लॅपटॉप पकडला होता. लाल रंगाचा भरजरी लग्नाचा पोषाख अंगावर असतानाच या नवरीने कंपनीसमोर आलेले एक मोठे संकट अवघ्या काही मिनिटांत दूर केले. तिची ही कृती पाहून सध्या इंटरनेटवर दोन गट पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
कोयल एआय या स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेहुल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. मेहुल यांनी त्यांची बहीण आणि कंपनीची सह-संस्थापक गौरी अग्रवाल हिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये गौरी लग्नाच्या कपड्यांत बसून लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे.
मेहुल यांनी सांगितले की, लग्नाचे विधी संपून अवघ्या 10 मिनिटे झाली होती आणि त्याच वेळी कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये एक मोठी तांत्रिक अडचण म्हणजेच बग निर्माण झाला. ही अडचण इतकी गंभीर होती की गौरीला त्याच अवस्थेत कामाला लागावे लागले.
People romanticize startups but it is a lot of work.
— Mehul Agarwal (@meh_agarwal) December 16, 2025
This is my sister & co-founder @gauri_al at her own wedding, 10 minutes after ceremony, fixing a critical bug at @KoyalAI.
Not a photo op, parents yelled at both of us.
When people ask why we won, I'll point to this. pic.twitter.com/ee3wTEYwXG
स्टार्टअप विश्वातील वास्तव
मेहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये स्टार्टअप सुरू करणे आणि ते चालवणे किती आव्हानात्मक असते, याचे वास्तव मांडले आहे. लोक स्टार्टअपच्या जगाकडे खूप ग्लॅमरस पद्धतीने पाहतात, पण प्रत्यक्षात त्यामागे प्रचंड कष्ट आणि धावपळ असते, असे त्यांनी म्हटले आहे.
लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी काम करत असल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी या दोघांनाही चांगलेच ओरडले होते. हा केवळ फोटो काढण्यासाठी केलेला स्टंट नव्हता, तर ती कामाची गरज होती, असेही मेहुल यांनी स्पष्ट केले. जेव्हा लोक आम्हाला विचारतात की तुम्ही यशस्वी कसे झालात, तेव्हा मी त्यांना हेच उदाहरण देईन, असे मेहुल यांनी अभिमानाने सांगितले.
( नक्की वाचा : सासू अशी असेल तर मुलगी कशी...सासूबाईंनी नवरदेवाचं असं केलं स्वागत की.. वऱ्हाडात संचारला जबरदस्त उत्साह, VIDEO )
हनिमूनमध्येही काम सुरुच
गौरीची ही कामाप्रती असलेली निष्ठा केवळ लग्नापुरती मर्यादित राहिली नाही. मेहुल यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये सांगितले की, गौरी सध्या तिच्या हनिमूनसाठी बाहेर गेली आहे. तिथेही ती दररोज 3 तास कंपनीच्या कामासाठी मीटिंग घेत आहे. या गोष्टीमुळे तिचा नवरा फारसा आनंदी नाही, असेही मेहुल यांनी मिश्किलपणे सांगितले. मात्र, एका स्टार्टअपला उभे करण्यासाठी अशा प्रकारच्या समर्पणाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस
ही पोस्ट व्हायरल होताच इंटरनेटवर कामाच्या पद्धतीवरून (वर्क-लाईफ बॅलन्स) मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी गौरीच्या या जिद्दीचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की, तुमचे हे कष्ट पाहून आनंद झाला, पण हे लक्षात ठेवा की व्यवसाय ही एक दीर्घ पल्ल्याची शर्यत आहे, त्यामुळे स्वतःला जपून काम करा.
दुसरीकडे, अनेक लोकांनी यावर टीकाही केली आहे. काही युजर्सच्या मते, आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी कामाला प्राधान्य देणे चुकीचे आहे. एका व्यक्तीने कमेंट केली की, ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली गोष्ट असावी, जर हे खरे असेल तर तिने आपले प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि आयुष्यातील मौल्यवान क्षण अशा प्रकारे कामात घालवणे योग्य नाही. तसेच, जर कामाचे योग्य नियोजन किंवा कामाचे वाटप करता येत नसेल, तर अशी परिस्थिती ओढवते, अशी टीकाही काहींनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world