Tadoba Nayantara Tigress Video Viral : चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील नयनतारा वाघिणी जागतिक पर्यावरण दूत बनली आहे. इंग्लंड, इटलीसह अनेक देशांमध्ये नयनताराचा एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. नयनताराचा हा व्हिडिओ भारतातील काही राज्यात पर्यावरण रक्षणाच्या संदेशासाठीही वापरला जात आहे. त्यामुळे नयनतारा आता पर्यावरणाची जागतिक दूत म्हणून ओळखली जात आहे.
तो व्हिडिओ...
पर्यटक व्याघ्रप्रकल्पात जातात आणि कचरा करतात. प्लास्टिकच्या बाटल्या जंगलात फेकून येतात. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. वारंवार सांगूनही पर्यटक त्याविरोधात वागत असल्याचं दिसून येतं. दरम्यान ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील नयनतारा वाघिणीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी हा व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये नयनतारा पाणवठ्यावर तरंगत असलेली बाटली तोंडात पकडून बाहेर काढते. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अवघ्या २३ सेकंदाचा हा व्हिडिओ मोठ्या संख्येने पाहिला गेला होता.
नक्की वाचा - भारतातच आहे Switzerland पेक्षा सुंदर ठिकाण! आनंद महिंद्राही झाले अवाक्..निसर्गाचा 'असा' Video कधी पाहिला नसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचा उल्लेख केला होता. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. इंग्लंडच्या सरकारी वाचनालयांमध्ये हा व्हिडिओ नियमितपणे दाखवून जनजागृती केली जात आहे. इटलीतील कॅम्पिडोग्लिओच्या प्रोमोटेका सभागृहात आयोजित इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळ्यात या व्हिडिओला पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय देशातील आंध्रप्रदेश, ओडिशा आणि हैदराबाद या राज्यातही या व्हिडिओचा वापर केला जात आहे.