Trending Reel South Indian women's dance : सध्या सोशल मीडियावर एक रील (Viral Reel) जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दक्षिणेकडील असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिणेकडील काही महिला या व्हिडिओमध्ये नाचताना दिसत आहे. तसं नृत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, मात्र हा व्हिडिओ त्यापेक्षा वेगळा आहे. या व्हिडिओमधील महिलांनी साडी नेसली असून नाचताचा त्यांच्यामधील जोश आणि उत्साह जबरदस्त आहे.
हा व्हिडिओ काही वेळात खूप व्हायरल झाला. या व्हिडिओचा वापर करून अनेक प्रकारचे मिम्सही तयार करण्यात आले. मात्र या महिला का नाचतात याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? जाणून घेऊया...
या महिला अशा का नाचतात?
दक्षिणेतील या महिला साडी नेसून नाचताना दिसत आहेत. या महिलांमधील उत्साह पाहून भलेभले गार झालेत. Knowledge Marathi ने यासंदर्भातील एक माहितीपर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका धार्मिक प्रथेअंतर्गत हे नृत्य केलं जात आहे. दक्षिणेतील एका मान्यतेनुसार, जेव्हा एखादी मुलगी आजारी पडते तेव्हा तिला श्रद्धेने मंदिरात नेलं जातं. मात्र तरीही तिची प्रकृती सुधारली नाही तर तिला मंगळसूत्र म्हणजे पोट्टू थाळी बांधून तिचं लग्न देवतेशी लावून दिलं जातं. हे लग्न लावून तिला मंदिराला अर्पण करण्याची प्रथा आहे. अशा महिलांना 'मथम्मा' म्हणतात. एकदा का या महिला 'मथम्मा' झाल्या तर त्यांना मंदिरातील जत्रा आणि कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणी नाचावं लागतं. तिला आयुष्यभर मंदिराची सेवा करावी लागते. तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या काही भागांमध्ये ही प्रथा अद्यापही सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. (आताही ही प्रथा सुरू आहे की नाही याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.)
नक्की वाचा - Shocking : परदेशी तरुणीकडून शरीर सुखाची मागणी, नकार देताच आरोपीचं किळसवाणं कृत्य; Video पाहून पोलिसांचा संताप
महाराष्ट्रातही देवदासीची प्रथा होती अस्तित्वात...
महाराष्ट्रातही कित्येक वर्ष देवदासीची प्रथा अस्तित्वात होती. यामध्ये महिलेला देवाला अर्पण केलं जात होतं. या महिलांना संगीत, नृत्य शिकवलं जात होतं. या महिला मंदिराची देखभाल करतात. मात्र श्रद्धेच्या नावाखाली अनेकदा त्यांचं लैंगिक शोषण केलं जात होतं. त्यामुळे महिलांसाठी शाप ठरणारी ही प्रथा भारतात बंद करण्यात आली आहे.
मथम्मा पद्धत काय आहे?
देवीला किंवा मंदिराला अर्पण करण्याच्या पद्धतीला मथम्मा म्हटलं जातं.ही पद्धत दक्षिणेतील मडिगा समुदाय आणि इतर समुदायांमध्ये आढळून येते. आंध्रप्रदेशातील चित्तूर आणि तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यांमध्ये ही पद्धत प्रचलित आहे. या महिलांना मथम्मा मंदिरामध्ये राहावं लागतं. अनेकदा त्यांना लैंगिक शोषणालाही सामोरं जावं लागतं, असं म्हटलं जातं.
(वरील दिलेली माहिती व्हिडिओवर आणि माहितीपर संकेतस्थळांवर आधारित असून NDTV मराठी कोणताही दावा करीत नाही)