Unique Wedding: आधुनिक काळातही लग्नातील प्रचंड खर्च आणि हुंड्याच्या कुप्रथा संपलेल्या नाहीत. हुंड्याच्या छळामुळे विवाहित महिलेनं जीव देण्याच्या धक्कादायक घटना अनेकदा उघड झाल्या आहेत. पण, याचवेळी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील एक लग्न संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरलं आहे. हे लग्न म्हणजे फक्त एक विवाह सोहळा नव्हता. तर त्यामधून एक सामाजिक संदेश देण्यात आलाय. ज्यामुळे या नवविवाहित जोडप्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कसं झालं लग्न?
बीकानेरच्या नोखा भागातील अलाय गावचे रहिवासी असलेले डॉक्टर सुमित कूकना यांनी नागौर जिल्ह्यातील थीरोद गावच्या डॉक्टर जसोदा काला यांच्याशी विवाह केला. विशेष म्हणजे, डॉक्टर सुमित याने हुंडा मुक्त समाजाचा संदेश देत, वधू पक्षाकडून हुंड्याच्या रूपात फक्त 1 रुपयाचा शगुन आणि एक नारळ स्वीकारला. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांना सुखद धक्का बसला आणि त्यांनी डॉक्टर सुमितच्या विचारांचे मनपूर्वक कौतुक केले.
( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
हत्तीवरून येऊन पूर्ण केला विधी
अलाय गावात मंगळवारी रात्री वरात पोहोचल्यानंतर तोरणाचा विधी पार पाडण्यासाठी डॉक्टर सुमित हे चक्क हत्तीवर स्वार होऊन आले. हत्तीवरून आलेल्या नवरदेवाला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती आणि हा क्षण सगळ्यांसाठीच खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्यानंतर वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार शुभ मुहूर्तावर या जोडप्याने सात फेरे घेऊन आपला विवाह संपन्न केला.
नवरदेवाच्या महत्त्वपूर्ण घोषणेने वधूपक्ष नि:शब्द
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी सकाळी वधूचा निरोप देण्याची वेळ आली, तेव्हा डॉक्टर सुमितने केलेली एक महत्त्वाची घोषणा जोरदार चर्चेचा विषय ठरली. त्याने आपले सासरे अणदाराम काला यांना स्पष्टपणे सांगितले की, त्याला हुंड्याच्या रूपात काहीही स्वीकारायचे नाही. त्याने केवळ 1 रुपया आणि एक नारळ एवढाच शगुन घेऊन सर्व विधी पूर्ण करण्याची विनंती केली. नवरदेवाच्या या थोर विचारधारेमुळे विदाईच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
डॉक्टर जसोदा यांच्या वडिलांनीही या सामाजिक बदलाला पाठिंबा दिला आणि पूर्ण विधी-विधानानुसार हुंड्याशिवाय हा विवाह संपन्न केला.
नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवला नवा आदर्श
या अनोख्या विवाहसोहळ्याला उपस्थित असलेले डॉक्टर सुमित यांचे मेव्हणे डॉक्टर हिम्मत केड़ली यांनी सांगितले की, हे नवदाम्पत्य दोघेही डॉक्टर आहेत. या सुशिक्षित जोडप्याने हुंडा न स्वीकारण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात हुंडासारख्या कुप्रथांना दूर ठेवून, इतरांनाही साध्या पद्धतीने विवाह करण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉक्टर नवरदेवाच्या या प्रेरणादायी निर्णयाचे सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. या जोडप्याने दाखवून दिले आहे की, समाजातील अनावश्यक रूढी आणि वाईट परंपरा बाजूला ठेवूनही आनंदी आणि यशस्वी वैवाहिक आयुष्याची सुरुवात करता येते.