UP Girl Naagin Mystery : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली होती, जिथे एका मुलीच्या अचानक बेपत्ता होण्याने संपूर्ण परिसरात अंधश्रद्धा आणि अफवांचे पेव फुटले होते. घरात मुलीच्या कपड्यांजवळ सापाची कात सापडल्याने ती मुलगी चक्क 'इच्छाधारी नागिन' बनून गायब झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता या प्रकरणाचा असा काही खुलासा झाला आहे की ज्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काय होते प्रकरण?
औरैया जिल्ह्यातील फफूंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सीगंनपुर गावात ही घटना घडली होती. रविवारी रात्री आपल्या घरात झोपलेली रीना नावाची तरुणी सोमवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली. जेव्हा कुटुंबीय तिला उठवण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना बेडवर तिचे कपडे आणि दागिने जसेच्या तसे ठेवलेले दिसले.
धक्कादायक बाब म्हणजे त्याच ठिकाणी 5 फूट लांबीची सापाची कात देखील पडलेली होती. हे दृश्य पाहून सर्वजण चक्रावून गेले. घरातून मुलगी गायब आणि तिथेच सापाची कात मिळाल्याने गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी तिला दैवी चमत्कार किंवा अंधश्रद्धेशी जोडण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : Love Story: 'ती' परत आली, पण नव्या ट्विस्टसह! जावयासोबत पळालेली सासू आता मेहुण्यासोबत गायब; नेमकं काय घडलं? )
नागिन बनल्याच्या अफवा
सापाची कात सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोकांनी तर ती मुलगी इच्छाधारी नागिन असावी आणि तिने रुप बदलून घर सोडले असावे, असे दावे करायला सुरुवात केली.
ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि आजूबाजूच्या गावातील लोकही हे पाहण्यासाठी गर्दी करू लागले. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी मिळताना पाहून पोलीस प्रशासनही सतर्क झाले होते. मात्र, या प्रकरणातील गूढ आता उकलले असून सत्य परिस्थिती समोर आली आहे.
( नक्की वाचा : Navi Mumbai News: फर्जी कॉल सेंटरला खाकीचे 'प्रोटेक्शन'; नवी मुंबई कनेक्शनने बड्या IPS अधिकाऱ्यांची झोप उडाली )
इंस्टाग्राम व्हिडिओतून झाला खुलासा
बेपत्ता झालेल्या रीनाने स्वतःच इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर करून या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ती एका तरुणासोबत दिसत असून तिने आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केल्याचे जाहीर केले आहे. व्हिडिओतील तरुणाला आपला पती असल्याचे सांगत तिने स्पष्ट केले की, हे पाऊल तिने कोणाच्याही दबावाखाली न येता उचलले आहे.
सासरच्या बाजूने कोणाला काही अडचण असेल, तर माझ्या माहेरच्या लोकांना उगाच त्रास देऊ नका, असे आवाहनही तिने या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
लग्नाचा निर्णय आणि पोलिसांची भूमिका
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये रीनाने पुन्हा एकदा हेच अधोरेखित केले की, तिने स्वमर्जीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाचेही अपहरण किंवा जबरदस्ती झालेली नाही, असे तिने ठामपणे सांगितले. आपल्यामुळे दोन्ही कुटुंबांना मानसिक त्रास किंवा टॉर्चर करू नये, अशी विनंतीही तिने केली आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे. मुलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना केले आहे. सापाची कात तिथे कशी आली आणि हा सर्व बनाव नेमका कसा रचला गेला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world