Shocking Twist in Aligarh Case: काही नाती रक्ताची असतात, तर काही विश्वासाची. पण जेव्हा हीच नाती सर्व मर्यादा ओलांडून अनपेक्षित वळण घेतात, तेव्हा समाजाचा थरकाप उडतो. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातल्या एका घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्याच मुलीचा होणारा नवरा, म्हणजेच भावी जावयासोबत सासूने पलायन केले होते. ज्या नात्याला पवित्र मानले जाते, त्या नात्याची विटंबना करणारी ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण ज्या जावयासाठी या महिलेने घरदार सोडले, आता त्यालाही गंडवून ती महिला तिसऱ्याच व्यक्तीसोबत फरार झाली आहे.
नात्यांचा गुंता आणि अजब प्रेम कहाणी
या विचित्र कहाणीची सुरुवात अलीगड जिल्ह्यातील मडराक परिसरातून झाली होती. एप्रिल 2025 मध्ये एका तरुणीचे लग्न राहुल नावाच्या मुलासोबत ठरले होते. 2 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. सासरच्या मंडळींनी जावयाला प्रेमाने मोबाईलही भेट दिला. पण कोणालाही कल्पना नव्हती की, लग्नाच्या नऊ दिवस आधीच काहीतरी भयंकर घडणार आहे.

6 एप्रिल रोजी ही मुलगी आपल्या होणाऱ्या पतीची वाट पाहत राहिली, पण तिचा होणारा पती चक्क तिच्या आईला, म्हणजेच आपल्या होणाऱ्या सासूला घेऊन पसार झाला. सासू सपना आणि जावई राहुल यांनी एकमेकांसाठी जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.
( नक्की वाचा : Shocking : घरात छळ, लिफ्टमध्ये गाठलं, केबिनमध्येही सोडलं नाही... प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार )
सीतामढीमध्ये थाटला संसार आणि पुन्हा घात
कुटुंबीयांनी खूप विरोध केला, समजावून सांगितले, अगदी दोन दिवस पोलीस ठाण्यात समुपदेशनही करण्यात आले. मात्र, सपना आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने स्पष्ट सांगितले की ती आता राहुलची झाली आहे आणि त्याच्यासोबतच राहणार. यानंतर हे दोघेही उत्तर प्रदेश सोडून बिहारमधील सीतामढी येथे राहू लागले.
गेल्या 10 महिन्यांपासून हे सासू-जावई पती-पत्नीप्रमाणे संसार करत होते. पण आता या प्रेमकहाणीत एक नवीन 'ट्विस्ट' आला आहे. ज्या राहुलसाठी सपनाने आपले कुटुंब आणि मुलीचे भविष्य पणाला लावले, त्याच राहुलला तिने आता वाऱ्यावर सोडले आहे.
( नक्की वाचा : Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळ परिसरात घर शोधताय? 'हेवी डिपॉझिट'ची ही बातमी वाचल्याशिवाय व्यवहार करू नका! )
आता मेहुण्यासोबत पसार
राहुलने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सपना आता त्याच्यासोबत राहत नसून ती तिच्या मेहुण्यासोबत (बहेनोई) फरार झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी सपनाने गंगीरी येथील राहणाऱ्या आपल्या मेहुण्यासोबत पलायन केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळीही तिने रिकाम्या हाताने पळ काढलेला नाही.
राहुलचा असा आरोप आहे की, सपनाने घरातून सुमारे 2 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ज्या महिलेने आधी मुलीच्या नवऱ्याला पळवले, तिने आता बहिणीच्या नवऱ्यासोबत संसार थाटल्याची चर्चा रंगली आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू
या विचित्र प्रकरणाने पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे. राहुलने तक्रार दाखल केली असली तरी अद्याप याप्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सपनाने मेहुण्यासोबत जाण्यापूर्वी पूर्ण प्लॅनिंग केले होते, असे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. दुसरीकडे, सपनाच्या पहिल्या पतीनेही आता दुसरे लग्न करून आपला नवा संसार सुरू केला आहे. नात्यांच्या या गुंत्यामध्ये सर्वच बाजूने सामाजिक नीतिमत्तेचा फज्जा उडाला असून, अलीगडपासून सीतामढीपर्यंत या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world