Viral News: ब्रिटनमध्ये एका 42 वर्षीय व्यक्तीसोबत अशी काही अजब घटना घडली की, तो स्वतःही घाबरला आणि सुरुवातीला डॉक्टरही अवाक् झाले. सकाळी उठल्याबरोबर त्याची त्वचा पूर्णपणे निळी दिसू लागली होती. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; पण तपासणीनंतर जे कारण समोर आले, त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये हशा पिकला.
सकाळी उठताच शरीर पडले निळे
'न्यू यॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील 42 वर्षीय टॉमी लिंच नावाच्या व्यक्तीने सांगितले की, सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. जेव्हा त्याने आपल्या शरीराकडे पाहिले, तेव्हा त्याची त्वचा निळी दिसत होती. हे पाहून तो प्रचंड घाबरला. केअरर (परिचारक) म्हणून काम करणाऱ्या एका मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात (इमर्जन्सी) डॉक्टरही त्याची अवस्था पाहून काळजीत पडले आणि त्यांनी त्याला ऑक्सिजन लावून तपासणी सुरू केली.
डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा सत्य आले समोर
तपासणीदरम्यान एका डॉक्टराने टॉमीचा हात 'अल्कोहोल स्वॅब'ने स्वच्छ केला. जशी त्यांनी त्वचा पुसली तसा तो कापसाचा बोळा लगेच निळा झाला. तिथूनच डॉक्टरांना नेमकी समस्या काय आहे हे लक्षात आले. खरं तर टॉमीने नुकतीच एक नवीन 'नेव्ही ब्लू' रंगाची बेडशीट (चादर) वापरायला सुरुवात केली होती. त्याने ती चादर न धुताच सलग दोन रात्री वापरली होती. त्याच बेडशीटचा रंग त्याच्या त्वचेला लागला होता, ज्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर निळे दिसत होते.
(नक्की वाचा: Ishan Kishan: ईशान किशनने जर्सीच्या आत स्पोर्ट्स ब्रा घातली होती? VIDEO होतोय व्हायरल, नेटकरी करत आहेत ट्रोल)
हॉस्पिटलमध्ये हशा पिकलाटॉमीने गंमतीने म्हटले की, तो 'अवतार' सिनेमातील पात्रासारखा दिसत होता. त्याने सांगितले की, डॉक्टरांनीही मस्करी करत म्हटले की त्यांनी यापूर्वी कधीही अशा व्यक्तीला पाहिले नव्हते जो पूर्णपणे निळा पडलाय आणि तरीही पूर्णपणे निरोगी आहे. ही केवळ बेडशीटच्या रंगाची कमाल आहे, हे समजताच हॉस्पिटलमधील वातावरण शांत झाले आणि सर्वजण हसू लागले.
एका आठवड्यानंतर रंग पूर्णपणे निघालाटॉमीने सांगितले की, हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतरही तो निळा रंग लगेच गेला नाही. अनेकदा आंघोळ केल्यानंतर साधारण एका आठवड्याने त्याची त्वचा पूर्णपणे सामान्य झाली. आंघोळ करताना पाणी देखील निळे होत असे. घरी पोहोचल्यावर त्याने सर्वात आधी आपल्या नवीन चादरी धुतल्या आणि त्यानंतर अशी समस्या पुन्हा कधीही उद्भवली नाही.
(Disclaimer: ही बातमी सोशल मीडियावर युजरने शेअर केलेल्या पोस्टवरून तयार करण्यात आली आहे. NDTV या कंटेंटच्या प्रामाणिकतेची पुष्टी करत नाही)