सध्या सोशल मीडियावर एका नावाची खूप चर्चा होतेय, ते म्हणजे सोलापूरचे सुखा पाटील. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या अफाट खाण्यापिण्याच्या आणि कामाच्या सवयींबद्दल चर्चा होत आहे. ते 35 भाकऱ्या खायचे, 1000 पेंढ्या बांधायचे आणि पाणी न पिता फक्त दूध प्यायचे, असे सांगितले गेले. या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, सुखा पाटील नेमके कोण आहेत, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण आहेत सुखा पाटील?
एका यूट्यूब चॅनलने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बजरंग कोळी यांची मुलाखत घेतली होती. त्यांना जुन्या काळातील लोकांच्या जीवनशैली आणि आहाराबद्दल विचारण्यात आले. बजरंग कोळी यांनी सुखा पाटील यांचे उदाहरण दिले. “सुखा पाटील सकाळी 35 भाकऱ्या खायचे. एक हजार पेंढ्या बांधायचे आणि फक्त दूध प्यायचे, पाणी नाही. कारण त्यावेळी शेळ्या खूप दूध द्यायच्या," असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सुखा पाटील एकटेच विहिरीतून पाणी काढायचे. ते 35 कणसे आणि अख्ख्या वाफेतील शेंगा खायचे, तसेच 5-6 ऊसाचे पेरेही खायचे.
((नक्की वाचा- Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा))
बजरंग कोळी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सुखा पाटील नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यानंतर ‘बंदा रुपया' या युट्युब चॅनलने स्वतः सुखा पाटील, म्हणजेच सुखदेव क्षीरसागर पाटील यांची मुलाखत घेतली. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील घराणीकी गावातले असून, सध्या ते पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे शेती करतात.
व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल ते म्हणाले, “मी विहिरीतून पाणी काढायचो, तेव्हा सकाळी भाजीसोबत सात भाकऱ्या खायचो. भरपूर दूध प्यायचो. मी दिवसाला जवळपास चार लिटर दूध प्यायचो. मी मेंढ्या चरायला घेऊन जायचो आणि तिथेच विहिरीतून पाणी काढायचो. एवढं काम होतं की मला खूप घाम यायचा. त्यावेळी माझ्यात खूप जीव होता. काम केल्याशिवाय मला स्वस्थ बसता येत नव्हतं,” असेही त्यांनी सांगितले. डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव बसल्यामुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला, हे देखील त्यांनी सांगितलं.
सोशल मीडियाची प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही. काही नेटकऱ्यांनी “एका मोठ्या शरीराचा माणूसही एवढं खाऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, एका इन्स्टाग्राम युजरने उत्तर दिले की, “ही गावाकडची माणसं आहेत. त्यांनी काय काय केलंय, हे तुम्हाला माहीत नाही. ही गोष्ट आश्चर्यकारक नाही. एका गावातल्या माणसाचा तरूणपणी असा आहार असू शकतो.”.