Bull Attack On Man CCTV Video: भटकी कुत्री, मोकाट जनावरांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. तसेच शहरांमध्ये, गल्लीबोळात भटक्या जनावरांचा हैदोस पाहायला मिळत असून सोशल मीडियावर जनावरांच्या क्रुर हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशीच भयंकर घटना गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात घडली आहे.
मोकाट बैलाचा तरुणावर हल्ला
शहरांमधील रस्त्यांवर अनेकदा मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव दिसून येतो. अशीच भयंकर घटना गुजरातमध्ये घडली आहेय. राजकोट जिल्ह्यातील कोटडा सांगाणी तालुक्यामधील वेरावळ गावात एका बैलाने दुचाकीस्वार तरुणावर जीवघेणा हल्ला केला. शिवनगरच्या एका अरुंद गल्लीत ही घटना घडली. खवळलेल्या बैलाने तरुणाला दुचाकीवरुन खाली पाडले, आपल्या शिंगांनी त्याला हवेत उडवले आणि नंतर तब्बल दोन मिनिटे त्याच्यावर क्रुरपणे हल्ला चढवला.
सुदैवाने त्याठिकाणी स्थानिक रहिवासी धावून आले आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या जखमी व्यक्तीला वाचवले व त्या जनावराला तिथून हुसकावून लावले. मात्र लोकांनी हुसकावून लावेपर्यंत या बैलाने तरुणाला पायाखाली तुडवून तुडवून शिंगाने हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुणाची अवस्था इतकी भयंकर झाली की तो अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिला. त्याला स्थानिकांनी उचलून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
भयंकर सीसीटीव्ही फुटेज समोर
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की ती व्यक्ती आपल्या दुचाकीवरून रस्त्यावरून जात असतानाच, तो बैल वाहनाच्या जवळ आला आणि त्याने दुचाकीला (आणि त्यावर बसलेल्या व्यक्तीलाही) जोराचा धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतरही त्या बैलाने त्या व्यक्तीवर हल्ला करणे सुरूच ठेवले, आणि ती व्यक्ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत राहिली. अखेरीस प्रतिकार करण्याची ताकद संपल्यामुळे ती व्यक्ती जमिनीवर कोसळली.
दरम्यान, या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून स्थानिक प्रशासन आणि नगरपालिकांनी निवासी भागांतून आक्रमक मोकाट जनावरांना हटवण्यासाठी तातडीने मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मोठ्या शहरांपासून ते आमच्यासारख्या छोट्या औद्योगिक केंद्रांपर्यंत, सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या कळपांनीच ताबा मिळवला आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यापूर्वी आणखी किती निरपराध लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागेल? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Viral VIDEO: गलगोटिया युनिव्हर्सिटीत राडा! दोन विद्यार्थिनींमध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी