- केरळमधील कन्नूर जिल्ह्यात एका जंगली रेड्याने दुचाकी शोरूमची काच फोडली आणि आत शिरला
- रेड्याचा वेग प्रचंड असल्याने शोरूममध्ये नुकसान झाले. कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली
- वनविभागाच्या अंदाजानुसार हा रेडा कन्नवम जंगलातून भरकटत आला होता
काही व्हिडीओ असे असतात ज्यामुळे तुमच्या काळजाचा ठोका चुकतो. असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ AI व्हिडीओ आहे की काय असे वाटते. पण तो खरा खुरा व्हिडीओ आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुथुपरम्बा परिसरात एका जंगली रेड्याने घातलेल्या धुमाकूळाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आपल्या कळपापासून भरकटलेला एक जंगली रेडा थेट एका दुचाकीच्या शोरूममध्ये शिरला. यावेळी रेड्याचा वेग इतका प्रचंड होता की शोरूमची दर्शनी काचेचे तुकडे तुकडे झाले. अगदी फिल्मी स्टाईलने या रेड्याने ती काच फोडली.
सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. शोरूमच्या काचेला धडक दिल्यानंतर रेडा आतमध्ये घसरला आणि भिंतीवर जाऊन आदळला. सुदैवाने, ज्या ठिकाणी हा रेडा शिरला तिथे कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेनंतर शोरूममधील कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. या रेड्याने शोरूममधील गाड्यांचेही नुकसान केले आहे. हा रेडा कन्नवम जंगलातून आला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
दुसरीकडे, राजस्थानमधील कोटा येथे दोन वळूंच्या (सांड) झुंजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नगर परिसरात भररस्त्यात दोन बैल एकमेकांशी भिडले. यामुळे रत्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांची मोठी तारांबळ उडाली. या झुंजीत काही दुचाकीस्वार खाली पडले, मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. तर केरळमधील घटनेत रेडा शोरूममध्ये शिरल्यानंतर कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. ही घटना सकाळी घडल्याने मोठी गर्दी नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नवम जंगलातून हा प्राणी भरकटत आला होता. तर या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानच्या कोटा शहरातूनही अशाच दहशतीचा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात दोन बैल एकमेकांशी भिडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. बैलांच्या धडकेमुळे काही तरुण दुचाकीवरून खाली कोसळले. कोटामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला असून, यापूर्वी अशा घटनांमध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला असल्याचं ही समोर आलं आहे.