Dog Attack Safety Tips: रस्त्यावरून चालताना किंवा रात्रीच्या वेळी निर्जन गल्लीतून जाताना अचानक समोरून कुत्र्यांचा कळप अंगावर धावून आला तर भल्याभल्यांची बोबडी वळते. विशेषतः रात्रीच्या शांततेत किंवा भरदुपारी जेव्हा रस्त्यावर कोणीही नसते, अशा वेळी कुत्री मागे लागली की भीतीपोटी अनेक जण जोरात पळू लागतात.
पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचे हे पळणेच तुमच्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकते? कुत्रे मागे लागल्यावर घाबरून पळाल्याने त्यांच्यातील शिकारी वृत्ती जागी होते आणि ते अधिक वेगाने तुमच्यावर हल्ला करू शकतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रसंगाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यातून स्वतःला कसे वाचवायचे, याचे काही महत्त्वाचे धडे देण्यात आले आहेत.
कुत्र्यांचा हल्ला आणि एका महिलेचा बचाव
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की, एका तरुण मुलीवर अचानक डझनभर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. ती मुलगी पूर्णपणे घाबरलेली असतानाच तिथे स्कूटीवरून एक महिला येते. त्या महिलेच्या हातात दुधाचा एक मोठा डबा असतो. ती महिला न घाबरता तो डबा उंचावून कुत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि आश्चर्य म्हणजे सर्व कुत्री तिथून पळ काढतात.
या व्हिडिओच्या दरम्यानच एका डॉग बिहेवियर एक्सपर्टचा चेहरा समोर येतो, जी अशा कठीण प्रसंगात नेमके काय करावे आणि आपला जीव कसा वाचवावा, याबद्दल मोलाचा सल्ला देते. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
तज्ज्ञांनी सांगितलेली बचावाची महत्त्वाची युक्ती
इन्स्टाग्रामवर थिंकिंग कॅनाइन नावाच्या हँडलवरून जिया नावाच्या एका महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्वतःला डॉग एक्सपर्ट म्हणवून घेणाऱ्या या महिलेने सांगितले आहे की, जेव्हा कुत्र्यांचा कळप तुमच्यावर हल्ला करतो, तेव्हा तुमच्याकडे विचार करण्यासाठी केवळ 1 किंवा 2 सेकंद असतात. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाबरू नका किंवा गोंधळून जाऊ नका.
तुमच्या मागे भिंत, झाड किंवा एखादी कार असेल, तर तिला पाठ लावून उभे राहा जेणेकरून कुत्रे तुमच्यावर मागून हल्ला करू शकणार नाहीत. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने धावू शकत नसाल, तर पळण्याचा प्रयत्न करू नका, कारण पळाल्यामुळे कुत्रे अधिक आक्रमक होतात.
( नक्की वाचा : Pet Care Tips: कुत्रे किंवा मांजरीच्या वासाने घरात टेन्शन? 'या' 4 सोप्या गोष्टींनी दूर होईल सर्व त्रास )
तुमच्याकडे असलेल्या वस्तूंचा असा करा वापर
जियाने या व्हिडिओमध्ये पुढे असेही सुचवले आहे की, आपल्याकडे असलेल्या साध्या वस्तूही आपला जीव वाचवू शकतात. तुमच्याकडे बॅग किंवा बॅकपॅक असेल तर तो तुमच्या आणि कुत्र्यांच्यामध्ये धरा. तुमच्याकडे केवळ मोबाईल फोन असेल, तर त्याचा वापर करून मोठा आवाज करा किंवा कुत्र्यांना मारण्याचा पवित्रा घ्या.
आपल्या जागेवर ठामपणे उभे राहून जेवढा मोठा आवाज काढता येईल तेवढा काढा, जेणेकरून कुत्रे बिचकतील. या व्हिडिओमधील दाव्यांची अधिकृत पुष्टी करणे कठीण असले, तरी संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवून दिलेली ही प्रतिक्रिया प्रभावी ठरू शकते, असे मत युझर्स व्यक्त करत आहेत.
विशेष सूचना : ही बातमी सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली आहे. बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. NDTV नेटवर्क या मतांची पृष्टी करत नाही, अथवा याच्या परिणांमाची जबाबदारी घेत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world