Viral Video : रस्त्यावर छोट्या-छोट्या कारणावरून वादाच्या घटना रोजच्याच पाहायला मिळतात. या वादांमध्ये महिलाही मागे नाहीत. बंगळुरूमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. जिथे एका ऑटो चालक आणि एका महिलेमध्ये जोरदार वाद झाला. पंखुरी मिश्रा नावाच्या या महिलेने लोकेश या रिक्षाचालकाला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होता आहे.
बंगळुरूमधील व्हायरल व्हिडिओमध्ये, महिलेचे म्हणणे आहे की, ऑटो चालकाने तिच्या स्कूटीला धडक दिली. तेव्हा वाद सुरू झाला. ऑटो चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि शिवीगाळही केली. मात्र रिक्षा चालकाने महिलेचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
बंगळुरूच्या गजबजलेल्या बेलांदूर भागात ही घटना घडली. महिला तिच्या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. त्यावेळी महिला आणि रिक्षा चालक यांच्यातील किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आरोप केला आहे की रिक्षाचालकाने तिच्या गाडीने धडक दिली, ज्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली. दुसरीकडे, रिक्षाचालकाने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. त्याने सांगितलं की, "माझ्या रिक्षाचा त्यांना धक्काही लागला नाही." या प्रकरणावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.
घटनेच्या वेळी, जेव्हा रिक्षाचालकाने महिलेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतापलेल्या महिलेने चप्पल काढून त्याला मारहाण केली, असं रिक्षाचालकाने सांगितलं. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने सांगितले की त्यांनी ऑटो चालकाची बाजू घेण्याचा प्रयत्न करू नये. संपूर्ण चूक ऑटो चालकाची आहे. मात्र या घटनेनंतर आणखी एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात हे जोडपे ऑटो चालकाची माफी मागताना आणि त्याच्या वाकून पाया पडताना दिसले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. एका छोट्या वादाला इतका मोठं बनवल्याबद्दल महिलेला अनेकांनी दोष दिला. मात्र या प्रकरणात कोणाची चूक आहे हे स्पष्ट नाही. कारण अनेकांचं असंही मत आहे की, बंगळुरूचे अनेक ऑटो चालक खूप गुंड प्रवृत्तीचे आहे.