Khamenei's Death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराण सरकारने देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. खामेनेई यांच्या निधनाने केवळ इराणमध्येच नव्हे, तर संपूर्ण मुस्लिम जगतात, विशेषतः शिया समुदायामध्ये शोककळा पसरली आहे. मात्र, इस्लाममध्ये मृत्यूंनंतर बरोबर ४० दिवसांचाच शोक का पाळला जातो आणि या 'चाळीस' Arba'een आकड्याचे महत्त्व काय आहे, याबद्दलची माहिती आता समोर येत आहे.
अयातुल्ला अली खामेनेई यांनी १९८९ पासून, म्हणजे सुमारे ३७ वर्षे इराणचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनाने इराणमधील एका प्रदीर्घ युगाचा अंत झाला आहे. आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
इस्लाममध्ये 'चाळीस' दिवसांचे महत्त्व...
इस्लामिक परंपरेनुसार, विशेषतः शिया संप्रदायात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरचा ४० वा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. याला 'अरबईन' असेही म्हणतात.
असं मानलं जातं की, मृत्यूनंतर आत्म्याला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी ४० दिवसांचा काळ लागतो. या काळात मृताच्या कुटुंबीयांकडून प्रार्थना आणि कुराण पठण केले जाते. ४० दिवसांच्या शोकाची ही परंपरा प्रामुख्याने इमाम हुसेन यांच्या बलिदानाशी जोडलेली आहे. कर्बलाच्या युद्धानंतर त्यांच्या हौतात्म्याचा ४० वा दिवस हा मोठ्या प्रमाणावर शोक आणि स्मरणाचा दिवस म्हणून पाळला जातो. धार्मिक ग्रंथांनुसार, मानवी जीवनात कोणत्याही मोठ्या बदलासाठी ४० दिवसांचा काळ महत्त्वाचा असतो.
इराणमध्ये आता काय आहे स्थिती?
- इराण सरकारने अधिकृतपणे ४० दिवसांचा शोक जाहीर केला असून या काळात देशातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.
- निधनानंतरचे पहिले सात दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- तेहरानसह इराणच्या प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world