पाकिस्तान: पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा भागात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन बसेसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाल्याचे तर 20 जण जखमी झाल्याच्या वृत्ताला स्थानिक अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेनजीक कुर्रम जिल्ह्यातील वाहनांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांनी कट रचलेला होता. दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी या बस जवळ येताच त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. ही बस खैबर पख्तूनख्वा हून पेशावर कडे जात होती. हल्ल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नक्की वाचा: संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
त्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या हल्ल्यामध्ये 6 महिलांचा आणि 3 लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. हल्ल्यात एकूण 50 जण दगावले असून 20 जण जखमी झालेले आहेत. स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे वर्चस्व असलेल्या भागामध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. त्यांनी हल्ल्याची चौकशी करून विस्तरृत अहवाल सादर करण्यासाठी कायदामंत्री, खासदार आणि मुख्य सचिवांचे शिष्टमंडळ कुर्रमला रवाना केले आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी सदर हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. सोबतच पीडितांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. निर्दोष नागरिकांना अशा पद्धतीने लक्ष्य करणे हे अत्यंत निंदनीय बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी हा हल्ला घडवला ते फार काळ कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, पर्वतीय उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रममध्ये सुन्नी आणि शिया मुस्लिमांमध्ये संघर्ष सुरू आहे. ही घटना त्याच जातीय हिंसाचाराशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या जातीय संघर्षात तीन महिला आणि दोन मुलांसह किमान 16 जणांचा मृत्यू झाला होता.