Iran US War: पेट्रोल-डिझेल सोडा, 2027मध्ये जगावर उपासमारीचं संकट? सौदी अरामकोच्या CEOचा धडकी भरवणारा इशारा

Iran Us War: केवळ युद्धच नाही तर उपासमारीचे संकट! अमेरिका-इराण वादामुळे 4.5 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ का येऊ शकते? सौदी अरामको कंपनीच्या सीईओंनी दिला गंभीर इशारा...

जाहिरात
Read Time: 3 mins
"America Iran Conflict: वर्ष 2027मध्ये जगावर उपासमारीचे संकट"
AFP

Iran Us War Updates: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेचे प्रयत्न आता धुळीस मिळताना दिसत आहेत. ट्रम्प प्रशासन आणि इराण यांच्यात कोणत्याही करारावर एकमत होत नाहीये. त्यामुळे आता जर पुन्हा युद्ध पेटले तर आधीच कमकुवत झालेली जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) पूर्णपणे कोलमडून जाईल. जर हा तणाव युद्धात बदलला तर प्रकरण फक्त पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपुरते मर्यादित राहणार नाही. तज्ज्ञांच्या मते यावेळी हा धोका थेट तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचणार आहे. जगासमोर असे संकट उभे राहू शकते, ज्याची कल्पनाही भयावह आहे.

सौदी अरामकोचे सीईओ अमीन नासिर यांनी या संभाव्य धोक्याबाबत कडक इशारा दिला आहे. त्यांच्या मते जग आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 'एनर्जी सप्लाय शॉक' म्हणजेच ऊर्जा पुरवठ्याच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. नासिर यांचे म्हणणे आहे की, जरी आज परिस्थिती सुधारली तरी बाजारपेठेला पूर्वीच्या स्तरावर येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागेल. पण जर युद्ध सुरू झाले आणि उशीर झाला, तर त्याचे वाईट परिणाम वर्ष 2027 पर्यंत भोगावे लागू शकतात.

Advertisement

तेलासोबत खतांचेही संकट

इराण आणि अमेरिका यांच्यातील या संभाव्य युद्धाचा सर्वात मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होईल. आधुनिक शेती पूर्णपणे खते आणि इंधनावर अवलंबून आहे. आखाती देशांतून होणारा पुरवठा खंडित होताच खतांचे उत्पादन आणि वितरण ठप्प होईल. संयुक्त राष्ट्राने (UNOPS) यावर चिंता व्यक्त करताना म्हटलंय की, जर पुढील काही आठवड्यांत कोणताही तोडगा निघाला नाही, तर जगाला मोठ्या मानवी संकटाचा सामना करावा लागू शकतो.

(नक्की वाचा: Gold Sliver Price Hike : सोनं-चांदीच्या दरात बंपर वाढ; अवघ्या एकाच दिवसात वाढलेले दर पाहून धक्काच बसेल!)

आकडेवारीनुसार या परिस्थितीत सुमारे 4.5 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात. तेलाच्या किमती वाढणे म्हणजे थेट शेतीचा खर्च वाढणे आणि मालवाहतूक महाग होणे होय. जेव्हा शेतापासून बाजारपेठांपर्यंत धान्य पोहोचवणे कठीण होईल, तेव्हा गरीब देशांमध्ये अन्नाची टंचाई सर्वात आधी आणि भयावह स्वरूपात दिसून येईल.

गरीब देशांवर दुहेरी संकट

जे देश आपल्या अन्नपदार्थांच्या गरजांसाठी अन्य देशांवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हे युद्ध एक काळ बनून येऊ शकते. जगातील अनेक देश असे आहेत जिथे शेती नगण्य आहे आणि ते धान्याची आयात करतात. युद्धाच्या परिस्थितीत कोणताही देश आपला सुरक्षित साठा सोडून धान्य निर्यात करण्याचा धोका पत्करणार नाही. प्रत्येक देश आधी आपल्या नागरिकांचे पोट भरण्याचा विचार करेल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात धान्याची मोठी टंचाई निर्माण होईल.

(नक्की वाचा : Gold Import Duty: आधी PM मोदींचे आवाहन, आता सरकारचा मोठा निर्णय; सोने खरेदीबाबत काढला महत्त्वाचा आदेश)

याशिवाय भौगोलिक आव्हानेही कमी नाहीत. युद्ध सुरू होताच 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मधील परिस्थिती सध्याच्या तुलनेत अधिक बिघडेल. शिपिंग कंपन्या अशा जोखमीच्या मार्गावरून माल नेण्यास कचरतील आणि जरी त्यांनी माल नेला, तरी विमा आणि मालवाहतुकीचा खर्च इतका जास्त असेल की सर्वसामान्यांसाठी धान्य खरेदी करणे अशक्य होईल.

Advertisement

युद्धाच्या स्थितीत कित्येक देशांमध्ये उपासमारीसारखे संकट येण्याची शक्यता (प्रतिकात्मक फोटो)
Photo Credit: United Nations

उत्पादन आणि पुरवठा साखळी तुटणे चिंताजनक

जेव्हा खतांचा पुरवठा थांबतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच नाही तर पुढील पीक चक्रावर होतो. म्हणजेच आज निर्माण झालेली कमतरता येणाऱ्या काही वर्षांपर्यंत धान्याचे उत्पादन कमी करेल. अमीन नासिर यांनी दिलेला वर्ष 2027चा इशारा याच दिशेने निर्देश करतो की, पुरवठा साखळी एकदा तुटली की अर्थव्यवस्थेचे पूर्ण चक्र ठप्प होऊ शकते.