लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपूर्ण देश व्यस्त असताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी खळबळजनक दावा केला आहे. बांगलादेश आणि म्यानमारमधील काही भाग तोडून इस्ट तिमोरसारखा ख्रिश्चन देश तयार करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप हसीना यांनी केलाय. आवामी लीगच्या अध्यक्ष असलेल्या हसीना यांनी काही दिवसांपूर्वी 14 पक्षांच्या बैठकीत बोलताना हा दावा केला. या पद्धतीचा कोणताही कट मी यशस्वी होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बांगलदेशमधील वेबसाईट 'द डेली स्टार' मधील रिपोर्टनुसार शेख हसीना यांनी एका देशानं एका गोऱ्या व्यक्तीतर्फे 7 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आपल्याला ऑफर दिली होती. या ऑफरनुसार त्या गोऱ्या व्यक्तीच्या देशाचा हवाई तळ बांगलादेशमध्ये उभारण्यास परवानगी दिली तर निवडणुकीत कोणताही अडथळा आणला जाणार नाही. बंगालचा उपसागर आणि हिंद महासागराच्या मार्गावर अनेकांची नजर आहे. इथं कोणताही वाद किंवा संघर्ष नाही. मी तसं होऊ देणार नाही, कारण तसं झालं तर तो माझ्यासाठी गुन्हा असेल, असं हसीना यांनी यावेळी सांगितलं. शेख हसीना यांनी यावेळी देशाचं नाव घेतलं नसलं तरी तो देश अमेरिका असल्याचा दावा विश्लेषकांनी व्यक्त केलाय. हसीना यांचे माजी सल्लागार इक्बाल शोभन यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत.
अमेरिकेचं नाव का?
बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील संबंध नोव्हेंबर 2023 पासून ताणले गेले आहेत. बांगलादेशमध्ये मागच्या वर्षी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली होती. त्यानंतर बांगलादेशमधील अमेरिकेच्या राजदूतांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली होती. देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याची त्यांनी मागणी केली होती. बांगलादेश सरकारनं अमेरिकेच्या या हस्तक्षेपावर टीका केली होती.
( नक्की वाचा : 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला )
शेख हसीना यांनी सांगितलं की, त्या देशात आणि विदेशात सर्वत्र लढाई लढत आहेत. बांगलादेशमधून वेगळा देश निर्माण करण्याचा कट सध्या रचला जातोय. इस्ट तिमोर प्रमाणे ते बांगलादेशमधील चट्टोग्राम आणि म्यानमारमधील काही भागावर बंगालच्या उपसागरात तळ निर्माण करण्यासाठी एक ख्रिश्चन देश तयार करतील.
द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 'शेख हसीना यांनी आपलं सरकार उलथवून टाकण्याचा आणि त्यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांच्याप्रमाणे आपली अवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं सांगितलं. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रणते असलेले शेख मुजीबूर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांची 15 ऑगस्ट 1975 रोजी हत्या करण्यात आली होती. रहमान यांच्या शेख हसीनासह दोन मुली या त्यावेळी परदेशात असल्यानं हल्ल्यातून बचावल्या होत्या.
( नक्की वाचा : Explainer : इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू भारतासाठी किती मोठा धक्का आहे? )
भारताला धोका का?
शेख हसीना यांचे माजी सल्लागार इक्बाल शोभन यांनी स्पुतनिक इंडियाला दिलेल्या माहितीनुसार,'अमेरिकन सरकार भारत विरोधी शक्तींना बळ देऊन दक्षिण आशियात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहे. बायडेन प्रशासनाकडून गेल्या वर्षीपासून म्यानमारमधील विद्रोहींना पाठिंबा दिला जात आहे. म्यानमारमधील कूकी-चिन बंडखोरांना अमेरिकेचा मुक पाठिंबा आहे. त्यामुळे फक्त म्यानमारच नाही तर भारत आणि बांगलादेशच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झालाय, असं त्यांनी सांगितलं.
बांगलादेशमधील सेंट मार्टिन या छोट्या बेटावर अमेरिकेची गेल्या अनेक दिवसांपासून नजर आहे. हे बांगलादेशच्या दक्षिण टोकाला असलेलं बेट आहे. फक्त 3 किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं हे बेट कॉकस बाजार-टेकनॉक द्विपकल्पापासून जवळपास 9 किलोमीटर दक्षिणेला आहे. बंगालचा उपसागर वगळता जगातील इतर सर्व सागरांमध्ये अमेरिकेचा तळ आहे. या बेटावर नाविक तळ उभारण्याची अमेरिकेची योजना आहे. त्यामाध्यमातून भारतासह बंगालच्या उपसागरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे अमेरिकेला सोपं जाईल. बांगलादेशनं अमेरिकेच्या या योजनेला अद्याप मान्यता दिलेली नाही. ही योजना मान्य होत नसल्यानंच नवा देश तयार करण्याची योजना सुरु आहे, असा आरोप शेख हसीना यांनी केला असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय.
( नक्की वाचा : 25 दिवस शिल्लक? भारतीय ज्योतिषाने केली तिसऱ्या विश्वयुद्धाची भविष्यवाणी )
कसा आहे इस्ट तिमोर?
इस्ट तिमोर यापूर्वी इंडोनेशियाचा भाग होता. 1999 साली संयुक्त राष्ट्राकडून घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये तेथील लोकांनी वेगळं होण्याच्या बाजूनं कौल दिला. 2002 साली या देशाला अधिकृत मान्यता देण्यात आली. या देशातील बहुसंख्य नागरिक ख्रिश्चन आहेत. अमेरिकेची या देशात महत्त्वाची उपस्थिती आहे. दोन्ही देशांनी संयुक्त लष्करी सराव देखील केला होता.