Arif Habib Wins Bid for Pakistan International Airlines (PIA): पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी असलेल्या पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या विक्रीची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. इस्लामाबादमध्ये मंगळवारी (23 डिसेंबर) झालेल्या एका खुल्या लिलावात प्रसिद्ध उद्योगपती आरिफ हबीब यांनी बाजी मारली. त्यांनी 135 बिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 4300 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावून या एअरलाइन्सची मालकी मिळवली आहे. पाकिस्तानसाठी ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे, कारण गेल्या दोन दशकांतील हा देशातील सर्वात मोठा खाजगीकरण व्यवहार आहे.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आपली सरकारी एअरलाइन्स खासगी हातात सोपवण्याचा निर्णय घेतला होता. या लिलावासाठी आरिफ हबीब यांच्यासह लकी सिमेंट आणि खासगी विमान कंपनी एअरब्लू या तीन प्रमुख कंपन्या रिंगणात होत्या. सुरुवातीला या तिन्ही कंपन्यांनी सीलबंद पाकिटात आपल्या बोली सादर केल्या.
हे बॉक्स उघडले गेले, तेव्हा आरिफ हबीब यांची 115 अब्ज पाकिस्तानी रुपयांची बोली सर्वाधिक ठरली. त्यानंतर लकी सिमेंट आणि आरिफ हबीब यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली. अखेर आरिफ हबीब यांनी 135 अब्ज रुपयांची अंतिम बोली लावली आणि एअरलाइन्स खरेदी केली.
( नक्की वाचा : New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल )
कोण आहेत आरिफ हबीब आणि काय आहे त्यांचे गुजरात कनेक्शन?
आरिफ हबीब हे पाकिस्तानमधील अत्यंत यशस्वी उद्योजक आणि आरिफ हबीब समूहाचे संस्थापक आहेत. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने पाकिस्तानची सरकारी एअरलाइन्स विकत घेतली, त्यांचे मूळ धागेदोरे भारताच्या गुजरात राज्याशी जोडलेले आहेत. हबीब यांचे कुटुंब मूळचे गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील बंटवा गावचे रहिवासी होते.
1947 मध्ये फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब आपली सर्व मालमत्ता आणि गुजरातचा चहाचा व्यवसाय सोडून पाकिस्तानमधील कराचीमध्ये स्थायिक झाले. आरिफ हबीब यांचा जन्म कराचीमध्येच झाला असला तरी त्यांचे पूर्वज गुजराती होते.
आरिफ हबीब यांचा व्यावसायिक प्रवास एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यांनी 1970 मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये स्टॉक ब्रोकर म्हणून कामाला सुरुवात केली होती. पुढे आपल्या कष्टाने आणि बुद्धीने त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले. ते अनेक वेळा कराची स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
आरिफ हबीब समूह आज रिअल इस्टेट, सिमेंट, खते, ऊर्जा, पोलाद आणि वित्तीय सेवा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे.
( नक्की वाचा : Veer Bal Diwas : भिंतीत जिवंत गाडले पण धर्म सोडला नाही; वाचा गुरु गोविंद सिंह यांच्या चिमुकल्यांची बलिदान कथा )
एअरलाइन्सवरील निर्बंध आणि दुर्घटनांचा काळा इतिहास
पीआयएची ही विक्री अशा वेळी झाली आहे जेव्हा या कंपनीने नुकतेच युरोपमधील आपली उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत. 2020 मध्ये कराचीमध्ये पीआयएचे एक विमान कोसळून 97 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने या एअरलाइन्सवर चार वर्षांसाठी बंदी घातली होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ही बंदी उठवण्यात आली, ज्यामुळे या कंपनीचे मूल्य वाढले आणि लिलावाचा मार्ग मोकळा झाला.
व्यावसायिक यशासोबतच आरिफ हबीब हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. आरिफ हबीब फाउंडेशनच्या माध्यमातून ते पाकिस्तानमध्ये आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाचे प्रकल्प राबवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पाकिस्तान सरकारने त्यांना 'सितारा-ए-इम्तियाज' या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील गौरवले आहे. सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या वेळी त्या विकत घेऊन त्या फायद्यात आणणे हे आरिफ हबीब यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world