थायलंडची राजधानी बँकॉकच्या बाहेरील भागात रविवारी रात्री उशिरा एका गजबजलेल्या पबमध्ये भीषण आग लागल्याने 30 हून अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात 63 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बँकॉकच्या लात फ्राव भागातील प्रसिद्ध 'रॉन्ग बीअर ना लात फ्राव' या लाईव्ह म्युझिक पबमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच थायलंडचे नवनिर्वाचित पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी सोमवारी पहाटेच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
शॉर्ट सर्किट आणि मोठा धमाका
प्रत्यक्षदर्शी आणि पबमध्ये उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये लाईव्ह शो सुरू असताना अचानक स्टेजजवळ बसवलेल्या मुख्य सर्किट ब्रेकरमधून धूर निघू लागला. काही सेकंदातच पबमधील सर्व लाईट बंद झाली आणि एक मोठा स्फोटासारखा आवाज आला. या पबमध्ये एकाच वेळी 300 पेक्षा जास्त लोकांच्या बसण्याची क्षमता आहे आणि रविवारी रात्री तिथे मोठी गर्दी होती. धमाका झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आगीचा भडका उडाला. आगीमुळे पबमध्ये प्रचंड विषारी धूर पसरला आणि हवेअभावी लोकांचा श्वास गुदमरण्यास सुरुवात झाली.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
टॉयलेटमध्ये अडकल्याने मृत्यूचे तांडव
पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी सांगितले की, जीव वाचलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये धूर भरल्यामुळे अनेक ग्राहकांनी मागच्या बाजूला असलेल्या टॉयलेटकडे पळ काढला. मात्र, दुर्दैवाने या टॉयलेटच्या परिसरात बाहेर पडण्यासाठी कोणताही आणीबाणीचा रस्ता नव्हता. परिणामी, अनेक मृतदेह मागच्या बाजूच्या बाथरुममध्ये आढळून आले असून, बहुतांश मृत्यू हे धुरामुळे गुदमरून झाले आहेत. मदत पथकाने आतापर्यंत 27 मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढले असून मृतांचा एकूण आकडा 30 वर पोहोचला आहे.
आगीच्या भडक्यात होरपळले लोक
मिळालेल्या माहितीनुसार, 63 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बँकॉकचे गव्हर्नर चाडचार्ट सिट्टीपुंट यांनी पत्रकारांना सांगितले की, जखमींपैकी 22 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. सोशल मीडियावर या आगीचे अत्यंत भीतीदायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोकांच्या कपड्यांना आग लागलेली असताना ते जीव वाचवण्यासाठी रस्त्याकडे पळताना दिसत आहेत.
एका टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले की, त्याने पबच्या दरवाजातून आगीच्या ज्वाळा बाहेर रस्त्यापर्यंत येताना पाहिल्या. स्वतः भाजले असतानाही धावत बाहेर येणाऱ्या 5 ते 6 लोकांना कपड्यांच्या साहाय्याने आग विझवून वाचवल्याचे त्याने सांगितले.